Karunanidhi Funeral : द्रविड राजकारणाचे प्रमुख आणि पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे एम करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून शोक व्यक्त होत असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार यावरुन अचानक वाद सुरू झाला. करुणानिधी यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येण्याची मागणी त्यांच्या समर्थकांसह नातेवाईकांनी केली होती, तर त्याला राज्य सरकारने विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर हा वाद उच्च न्यायालयात गेला आणि आज सकाळी न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर करुणानिधींची समाधी मरीना बीचवरच होईल असा निर्णय दिला आहे.

जाणून घेऊया करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बीचचाच इतका आग्रह का होता-

– चेन्नईचा मरीना बीच हा केवळ एक समुद्र किनारा नाहीये, कारण येथील राजकारणात मरीना बीचला विशेष महत्त्व आहे.
– हा बीच द्रविडी राजकारणाचा इतिहास सांगतो.
-ही जागा दिग्गज द्रविड राजकारण्यांच्या समाधीसाठी ओळखली जाते.
-डीएमके पक्षाचे संस्थापक अन्ना दुरई यांची समाधी येथे आहे.
-त्यांच्यानंतर येथील दुसरे दिग्गज नेते एमजीआर यांची समाधीही मरीना बीचवर आहे.
-याशिवाय तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनाही येथेच जागा देण्यात आली.
-त्यामुळे लोकनेते अशी प्रतिमा राहिलेले करुणानिधी यांच्यासाठीही मरीना बीचवरच जागा मिळावी यासाठी त्यांचे चाहते आणि समर्थक आग्रही होते.
-येथे उल्लेखनीय म्हणजे, द्रविड आंदोलनाची ज्यांनी सुरूवात केली आणि द्रविड आंदोलनाची जनक अशी ओळख असलेले पेरियार यांची समाधी येथे नाही. तशी त्यांची इच्छा नव्हती. पेरियार यांनी निवडणुकांच्या राजकारणात उतरण्यास नकार दर्शवला होता. त्यामुळे ते अन्य नेत्यांप्रमाणे रूढार्थानं राजकारणी नव्हते. ‘पेरियार थेडल’ नावाने चेन्नईतल्या दुसऱ्या ठिकाणी त्यांची समाधी आहे.