मुंबईहून जयपूरला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये एका कर्मचारी हवेचा दाब नियंत्रित करणारा स्विच (bleed switch) सुरु करायचा विसरला. परिणामी विमानातील हवेचा दाब वाढल्यामुळे १६६ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. ३० प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त आले. काही लोकांना डोकेदुखीचा त्रास झाला. तर काहींना मळमळ होऊ लागली. हा प्रकार अचानक सुरू झाल्याने विमानात एकच घबराट पसरली.

विमान टेक ऑफ करताना प्रत्येकवेळी एअरहोस्टेस प्रवाशांना काही सुचना करत असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे याची सूचना प्रत्येक विमान उड्डाणाच्यावेळी दिली जाते. त्याप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन मास्क कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिक करुन दाखवतात. विमान टेक ऑफ करताना आणि नंतरही विमानाच्या आतला हवेचा दाब(केबिन प्रेशर) बदलत राहतो. विमान टेक ऑफ करताना हवेचा दाब अचानक वाढल्यामुळे आपले कान सुन्नही होतात.

आपण जसजसे समुद्रसपाटीपासून उंचीवर जाऊ तसतसे ऑक्सिजनचे प्रमाण कमी-जास्त होत राहते. त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणून ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी विमानामध्ये केबिन प्रेशरचा वापर केला जातो. जर विमानातील हवेचा दाब नियंत्रित नाही झाला तर विमानाला समुद्रसपाटीपासून योग्य उंचीवर आणावे लागते, जेणेकरून प्रवासी श्वास घेऊ शकतील. विमान हवेमध्ये झेपावते त्यावेळी आतमधील हवेचा दाब वाढला जातो आणि ज्यावेळी विमान लँडिंग करते त्यावेळी हवेचा दाब कमी व्हायला सुरूवात होते.

विमानातील हवेचा दाब नियंत्रित नसल्यास, श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि पुरेशा ऑक्सिजनच्या अभावी प्रवाशाचा मृत्यूही होऊ शकतो. केबिन प्रेशर व्यवस्थित नसल्यामुळे हायपोक्सियाच्या समस्येला सामोरं जावे लागू शकते. हायपोक्सियामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन एखाद्या प्रवाशाचा मृत्यूही होऊ शकतो.