भारताला आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकत नाही. त्यांच्यासमोर आम्ही खूप छोटे आहोत असे मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी म्हटले आहे. भारताने मलेशियाकडून पाम तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. त्या मुद्यावर महाथीर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि काश्मीर या भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे भारत मलेशियावर नाराज आहे. या दोन्ही विषयांवर मलेशियाने पाकिस्तानला पूरक भूमिका घेतली आहे. त्याशिवाय मलेशियाने झाकीर नाईकला दिलेला कायमस्वरुपी नागरिकत्वाचा दर्जा रद्द करण्यास नकार दिला आहे. झाकीर नाईकवर भारतात वेगवेगळे आरोप आहेत. झाकीर नाईक गेल्या तीन वर्षांपासून मलेशियामध्ये वास्तव्याला आहे. या तीन मुख्य कारणांमुळे मोदी सरकार मलेशियावर नाराज आहे.

“भारताला प्रत्युत्तर म्हणून कुठलीही पाऊले उचलण्यास आम्ही खूप छोटे आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग शोधावे लागतील” असे मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले.

मलेशिया नाही मग आता कोण करणार पाम तेलाचा पुरवठा?
मागच्या पाच वर्षांपासून भारत ही मलेशियासाठी पाम तेलाची मोठी बाजारपेठ होती. पण भारतीय व्यापाऱ्यांवर आता मलेशियाकडून पाम तेलाची खरेदी करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे भारताने मलेशियाकडून पाम तेलाची खरेदी कमी केली आहे. त्याऐवजी इंडोनेशियाकडून भारताने आयात वाढवली आहे. इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा उत्पादन खर्चही कमी आहे.