28 February 2021

News Flash

Explained : जे.पी. नड्डा यांच्याकडे का आलं भाजपाचं अध्यक्षपद? ही आहेत पाच कारणं

एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.

भाजपाचे नेते जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपाचे सर्वोच्च पद आले आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. गेली काही दिवस ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणं यामागे अनेक कारणं आहेत.

पहिले कारण : RSSसोबत असलेली घट्ट नाळ
पाटणा येथे एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले जे.पी. नड्डा हे विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. १९८४ मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवलं होतं. १९८६ पासून नड्डा राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सुरुवातीला अभाविपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १९८९ पर्यंत ते अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. जे.पी. नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवकही आहेत. या संघटनेशी असलेली घट्ट नाळ त्यांना भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होताना कामी आली.

दुसरे कारण : स्वच्छ प्रतिमा
जे. पी. नड्डा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पडले नाहीत. त्यांची प्रतिमा कायम स्वच्छ अशीच राहिली. हिमाचल प्रदेशात ते आरोग्यमंत्री होते. त्यानंतर गडकरींनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणले. २०१० साली त्यांना भाजपाचे महासचिव केले. ही त्यांच्या कामाची पावती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपाचा अध्यक्ष स्वच्छ प्रतिमेचा हवा होता, असे सांगण्यात येते. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष असलेले जे.पी. नड्डा यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आल्याची चर्चा आहे.

तिसरे कारण : अमित शाह यांचे विश्वासू
जे. पी नड्डा अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर अमित शाह यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच त्यांना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचं कौशल्य नड्डा यांच्यात आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना लागू करण्यात नड्डा यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ही कामगिरी त्यांना या निवडीवेळी फायद्याची ठरली.

चौथे कारण : मतांच्या गणितात तरबेज
नड्डा यांना मतांचे परफेक्ट गणित जमतं, असं सांगितलं जातं. त्याचा अनुभव भाजपानं घेतला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपानं नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती. यावेळी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीचे आव्हान नड्डा यांच्यासमोर होते. पण, नड्डा यांनी ८० पैकी ६२ जागा निवडून आणल्या. मतांचे गणित त्यांनी ओळखले होते. त्यांच्या या विजयी कामगिरीमुळे पक्षात त्यांचा चांगला दबदबा निर्माण झाला.

पाचवे कारण : उत्तम संघटन कौशल्य
नड्डा यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. शिवाय राजकीय चाणाक्षपणाही त्यांच्याकडे आहे. पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे शाह यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शाह यांचे निकटवर्तीय असलेले नड्डा यांच्याकडे या अध्यक्षपदासाठी योग्य नेते म्हणून पाहिले जात होते. सुरूवातीला त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा आली. ही धुरा त्यांनी योग्यरिता सांभाळली. अनेक राज्यांत दौरे केले. त्यानिमित्ताने त्यांचा देशभरातील भाजपा नेत्यांशी जवळचा संबंधही आला. त्यांची काम करण्याची हीच पद्धत कदाचित मोदी-शाह यांना आवडली असावी आणि त्याच जोरावर त्यांना हे अध्यक्षपद मिळाले असावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 6:50 pm

Web Title: why modi shah selected jp nadda as a bjp president pkd 81
Next Stories
1 फेसबुक फ्रेंडला भेटायला गेली, चौघांनी जंगलामध्ये केला सामूहिक बलात्कार
2 पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! आता भारत पाण्याखालूनही करु शकतो अण्वस्त्र हल्ला
3 पतीसोबत जंगलात ट्रेकिंगला गेली आणि हत्तीने पायदळी तुडवलं
Just Now!
X