आठवडाभरापूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय चेनेन या संशयित आरोपीस गोळ्या झाडून ठार केलं. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद असं सांगत ‘इस्लाम आपले भविष्य हेरावून घेण्याच्या विचारात आहे मात्र हे कधीच होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली. यानंतर इस्लामिक देश आणि फ्रान्स यांच्यामधील वाद वाढत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. मॅक्रॉन यांनी महंमद पैगंबरांच्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केलं. मात्र हे प्रकरण वर वर एवढं दिसत असलं तरी यामागे अनेक गोष्टी आहेत.
महंमद पैगंबरांचं कोणतंही व्यंगचित्र म्हणजे इश्वराची निंदा आहे असं मुस्लीम मानतात. त्यामुळेच आता मुस्लीम देशांनी फ्रान्समधील वस्तुंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र फ्रान्सने या बहिष्कार घालण्याच्या मोहिमेला काही कट्टर अल्पसंख्यांकांचा डाव असल्याचे म्हटलं आहे. मात्र दिवसोंदिवस या प्रकरणाचे गांभीर्य वाढत असून फ्रान्सला मुस्लीम राष्ट्रांकडून होणारा विरोधही वाढताना दिसत आहे. सोशल मीडियापासून ते अधिकृत पत्रक जारी करण्यापर्यंत अनेक माध्यमांमधून मुस्लीम देशांनी या प्रकरणाचा विरोध केला आहे.
कुवेतमध्ये ६० वेवगेळ्या गैर सरकारी को ऑप्रेटीव्ही संस्थांनी २३ ऑक्टोबर रोजी फ्रान्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आंदोलन केलं. अनेक दुकानदारांनी फ्रेन्च वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कतार विद्यापिठानेही फ्रान्सची भूमिका ही इस्लामविरोधी असल्याचे सांगत फ्रेंच सांस्कृतिक सप्ताहचे कार्यक्रम रद्द केले. मुस्लीम देशांमध्ये फ्रान्स आणि मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत.
मॅक्रॉन यांना उपचार घेण्याची गरज
टर्कीचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांनी या प्रकरणासंदर्भात अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. मॅक्रॉन यांनी मुस्लीम आणि इस्लामसंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचे दिसून येत असल्याचा टोला एर्दोगन यांनी लगावला आहे. “ज्या देशात लाखो मुस्लीम राहतात तेथील प्रमुख नेत्यालाच श्रद्धा आणि स्वातंत्र्याबद्दलच फारशी माहिती नसेल तर याबद्दल आणखीन काय बोलावं?,” असंही एर्दोगन यांनी म्हटलं आहे.
कुवेतच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फ्रान्समध्ये शिक्षकाची हत्या करण्यात आलेल्या घटनेची निंदा केली. मात्र या विषयावरुन राजकारण करुन द्वेष आणि वंशवाद पसरवणं योग्य नाही असंही म्हटलं आहे. सौदी अरेबियातील ५७ देशांच्या संघटनेने प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं काढण्याच्या कृतीची निंदा केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या धर्मातील इश्वराची निंदा केली जाऊ शकत नाही, असंही या संघटनेनं म्हटलं आहे.
इम्रान खानही संतापले
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही या वादामध्ये उडी घेतली असून ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी मॅक्रॉन यांनी सहानभूतीने विचार करुन बोलायचं हवं होतं. ध्रुविकरणाचे राजकारण करुन कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं असंही इम्रान यांनी म्हटलं आहे. “हा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा नाझीवादी दृष्टीकोन झाला. हा दृष्टीकोन इस्लामबद्दल भीती निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो,” असं इम्रान म्हणाले आहेत. तर मोरक्को आणि जॉर्डननेही पैगंबर यांची व्यंगचित्रं छापवण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहेत.
The last thing the world wants or needs is further polarisation. Public statements based on ignorance will create more hate, Islamophobia & space for extremists.
— Imran Khan (@ImranKhanPTI) October 25, 2020
फ्रान्सकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु
मुस्लीम देशांनी ज्यापद्धतीने एकत्र येऊन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेचा विरोध केला आहे, फ्रान्समधील उत्पादनांना विरोध करण्यास त्यांच्यावर बहिष्कार घालण्यास सुरुवात केल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य फ्रान्सच्या लक्षात आलं आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि राजकीय तज्ज्ञांनी फ्रान्समधील उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भातील मोहीम मागे घेण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे मॅक्रॉन यांनाही ट्विटरवरुन आपण द्वेष परसवण्याच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही असं म्हटलं आहे. “मी द्वेष पसरवणारी वक्तव्य करण्याच्या बाजूने नाहीय. मी मानवाचा सन्मान केला जावा आणि वैश्विक मुल्यांचे जतन करण्याचे समर्थन करतो,” असं मॅक्रॉन म्हणाले आहेत. तसेच सर्व धर्मियांनी शांतता आणि एकतेवर विश्वास ठेवावा असंही मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.
इतर कारणांचीही चर्चा
एका शिक्षकाची हत्या किंवा व्यंगचित्रांमुळे हे प्रकरण एवढे टोकाला गेलेले नाही असं काही तज्ज्ञ सांगतात. एका अहवालानुसार ६० लाख मुस्लीम राहत असलेल्या फ्रान्सविरोधात अनेक मुस्लीम राष्ट्रांनी एकाच वेळेस आवाज उठवण्यामागे वेगळी कारण असल्याचेही सांगितलं जात आहे. यापैकी काही कारणं खालीलप्रमाणे
> १९०५ मध्ये सर्व धर्मसमभाव असं धोरण स्वीकारणाऱ्या फ्रान्सवर मागील काही वर्षांपासून इस्लामद्वेषी असल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. फ्रान्समधील मुस्लिमांना काऊंटर सोसायटी असं म्हटलं जातं. २००४ साली बुर्ख्यावर प्रतिबंध घालणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश होता.
> मॅक्रॉन यांनी इस्लाम सुधारणेसंदर्भात या पूर्वी वक्तव्ये केली आहेत. यावर अनेकांनी टीका केल्याचेही पहायला मिळालं. फ्रान्समध्ये २०१२ साली मुस्लिमांनी ३६ वेळा हल्ला केल्याचीही नोंद आहे.
> २०२२ साली होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मॅक्रॉ़न ही वक्तव्य करत असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
> मॅक्रॉन यांनी अनेकदा इस्लाम संकटात असल्याची वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या मंत्र्यांनाही अनेकदा इस्लामिक फुटीरतावाद आणि धर्माला केंद्रस्थानी ठेऊन फ्रान्सविरोधात युद्ध पुकारण्यासंदर्भातील वक्तव्ये केली आहेत.
एकंदरितच आपल्या भूमिकेमुळे फ्रान्स अडचणीत सापडल्याचे चित्र सर्व प्रकरणाकडे पाहिल्यावर दिसत आहे. मात्र आता व्यापारी तोटा होऊ नये म्हणून फ्रान्सचे हलचाली सुरु केल्या असून हा वाद नक्की कधी शांत होईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 11:42 am