सार्क परिषदेच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  मुंबईवरील २६११चा दहशतवादी हल्ला विसरता येणार नाही, हे नमूद करत सार्क देशांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात विकासासाठी चांगला शेजारी असणे गरजेचा सांगत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला श्रीलंका, बांग्लादेश या अन्य सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा उल्लेख केला. मात्र, त्याचवेळी भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा नामोल्लेख मोदींनी टाळला. नरेंद्र मोदींचे हे पाऊल भारतातील दहशतवादी कारवायांशी संबंधित असणाऱ्या पाकिस्तानसाठी कठोर इशारा असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि शरीफ यांची भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी अशी कोणतीही भेट ठरल्याचे स्पष्टपणे नाकारले. मोदींच्या कार्यक्रमात अशा कोणत्याही भेटीचा कार्यक्रम नसल्याचे परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे.