माकन यांचा सरकारला प्रश्न
पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे पाकिस्तानात रुतलेली असतानादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानचे नाव घेण्यास का कचरत आहेत, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी उपस्थित केला.
पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या तळाजवळ सलग ५० तासांपेक्षाही जास्त काळ धूमश्चक्री सुरू आहे. लष्करी जवानांनी प्राणांची बाजी लावून या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले. केंद्रीय स्तरावरदेखील पंतप्रधान, केंद्रीय मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले आहे.
पठाणकोटमधील हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानातून हलवली जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अशावेळी पाकिस्तानचे नाव न घेण्याच्या सरकारच्या रणनीतीतून काय अर्थ काढावा, अशी शंका माकन यांनी उपस्थित केली. ते म्हणाले की, दहशतवादी व भारतीय जवानांमध्ये संघर्ष सुरू असताना केंद्रीय मंत्री हरसिमरन कौर बादल यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाई संपल्याचे घोषित केले. त्यांनी तर सरकारचे अभिनंदन करून टाकले. प्रत्यक्षात कारवाई सुरू आहे. जर केंद्रीय मंत्र्यांनाच सरकारमध्ये काय चालले आहे हे माहिती नसेल तर देशवासीयांना कसे कळणार, अशी टीका माकन यांनी केली. देशावर हल्ला झाला असताना पंतप्रधान, गृहमंत्री अथवा संरक्षण मंत्री – यांच्यापैकी कुणीही पठाणकोटला गेले नाही. तेथे सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडीची माहिती देशाला मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानविरोधी वक्तव्ये करून जनमत प्रभावित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माकन यांनी लक्ष्य केले. आता पाकिस्तानशी चर्चेऐवजी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकण्याची गरज आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन सरकारने आंतरराष्ट्रीय दबावगट तयार केला होता. त्यातून पाकिस्तानची कोंडी झाली होती. परंतु नव्या सरकारने मात्र तसे काहीही केले नाही.