– धवल कुलकर्णी

“तबलिगी प्रकरणानंतर देशात करोना-जिहाद बाबत दुष्ट प्रचार केला जात आहे. हे सर्व प्रयत्न देशातील मुसलमानांना बदनाम करण्यासाठी होत आहेत. तबलिगी जमातला दोष देताना हे लक्षात घ्यायला हवं की त्याच वेळेला संसदेचे अधिवेशन सुद्धा सुरू होतं आणि अयोध्येला कार्यक्रम घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्लाची मूर्ती सुद्धा हलवली होती,” मग दोष फक्त तबलिगीनाच का दिला जातोय असा उद्विग्न प्रश्न ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या विशेष मुलाखतीत औवैसी यांनी  “आपण एका अशा होडी मध्ये आहोत ही जी एका भयंकर तुफानात अडकली आहे. बाहेरच्या तुफानाचा मुकाबला करून या होडीला सहीसलामत त्यातून बाहेर काढायचे असेल तर या होडीमध्ये दुसरं कुठलं तुफान माजू नये याची काळजी घ्यायला हवी,” असे आवाहन केले.

करोना आणि त्या मुळे करण्यात आलेली टाळेबंदी व तबलिगी मरकज या दिल्लीतल्या कार्यक्रमानंतर त्यात सहभाग घेतलेल्यांना झालेली करोनाची लागण व त्या अनुषंगाने देशात हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“करोनाचा वायरस संपवता येईल पण या व्हायरसचं काय?”

ओवैसी म्हणाले की करोना-जिहादबाबत प्रचार हा अत्यंत चुकीचा आहे, कारण आजार जात आणि धर्म पाहून येत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये एका मुस्लिम मुलाला टोमणे मारून एवढा त्रास देण्यात आला की त्या बिचार्‍याने शेवटी आत्महत्या केली आणि मग असे लक्षात आले की करोनासाठी केलेल्या चाचणीचा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. मुसलमान समाजाचे लोक अन्नामध्ये थुकतात, फळांना थुंकी लावतात हे व्हिडीओ सुद्धा खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.

राजस्थानमध्ये मुस्लिम समाजाचा एक माणूस आपल्या गरोदर पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, त्यावेळी केवळ तो मुसलमान आहे या कारणामुळे उपचारासाठी नकार देण्यात आला. शेवटी त्या अर्भकाचा मृत्यू झाला. या सगळ्याला काय म्हणावं? देशामध्ये विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, असे ओवैसी म्हणाले.

या रोगाच्या प्रसारासाठी जर तबलिगी जमात जबाबदार असेल तर चीन, स्पेन, इटली, अमेरिका आणि इंग्लंड इथेपण तबलिगी जमात आहे का? करोनाचा धोका हा समस्त मानव जातीला आहे आणि याचा मुकाबला एकत्रितपणे करण्याऐवजी आपण आपल्यामध्ये दुही करून शिव्या देत आहोत हे दुर्देवी आहे असे ओवैसी म्हणाले.

जोपर्यंत गायिका कानिका कपूरला करोनाची लागण झाली नाही तोपर्यंत कोणाला या आजाराचे महत्त्व नीट उमगले नव्हते. हिंदू असो किंवा मुसलमान या देशातले सगळे लोक या आजाराच्या बाबतीत एकाच होडीत प्रवास करत आहेत. हि होडी वादळाच्या गर्तेत सापडली आहे आणि जर या होडीच्या आत एक वेगळं वादळ निर्माण झालं तर बाहेरच्या वादळाचा मुकाबला कसा करायचा? असा प्रश्न त्यांनी केला. “करोनाचा वायरस संपवता येईल पण या व्हायरसचं काय?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.