भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला पाकिस्तानने पत्रकारांना त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना जाबा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आले त्यावेळी तिथे १०० ते १५० मुले शिक्षण घेत होती.

२६ फेब्रुवारीला भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जणू काही घडलेच नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. जर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचा तळ उद्धवस्त झाला नाही मग पाकिस्तानला पत्रकारांना घटनास्थळी घेऊन जायला दीड महिना का लागला?. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाबा टेकडीवरील तो एक साधा मदरसा होता. जिथे धार्मिक शिक्षण दिले जाते. मग मदरशाच्या भेटीच्यावेळी इतका लष्करी फौजफाटा तिथे का होता ?

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकारांना घटनास्थळी का जाऊ दिले नाही? एअर स्ट्राइकनंतर नवव्या दिवशी सुद्धा रॉयटर्सच्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून का रोखण्यात आले ? जर नुकसानच झाले नाही मग पाकिस्तान इतके दिवस काय लपवत होता ? या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानकडे आहेत का? एअर स्ट्राइकबद्दल संशय घेणारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या विषयाच्या मूळाशी जाणार आहेत का? हा मूळ प्रश्न आहे.

पाकिस्तानने ज्या पत्रकारांना घटनास्थळी नेले होते त्यांना स्थानिकांशी जास्त वेळ बोलू नका असे निर्देश दिले होते. बीबीसीच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवा यांना इथे आणण्यासाठी इतका उशीर का केला ? असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी वेळ मारुन नेणारे उत्तर दिले. घटना वेगाने घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही असे बाजवा यांनी सांगितले. पत्रकार जेव्हा स्थानिकांशी बोलत होते त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष होते असे बीबीसीच्या पत्रकारनेच म्हटले आहे.

पाकिस्तानने भले आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना बालाकोटच्या जाबा टेकडयांची सफर घडवली असेल पण त्यांच्याकडे ४३ दिवस का लागले ? या प्रश्नाचे उत्तर नाही. पत्रकारांना जो मदरसा दाखवण्यात आला तो अत्यंत दुर्गम भागात आहे. पत्रकार हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर दीड तास पायपीट करुन जाबा टेकडीवर पोहोचले. मुख्य नागरीवस्तीपासून हा भाग खूप दूर असल्यामुळे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ही अत्यंत योग्य आणि मोक्याची जागा आहे. त्यामुळे तिथे जैशचा दहशतवादी तळ होता हा भारताचा दावा शंभर टक्के खरा आहे. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले. एअर स्ट्राइकवर संशय घेणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.