Chandrayaan 2 : चंद्रावर लँडीग करण्यापूर्वी काही क्षणांपूर्वीच ‘विक्रम’शी संपर्क तुटला आहे. त्यामुळे इस्त्रोमधील सर्व शास्त्रज्ञांचे चेहऱ्यावर निराशा होती. तणावात असणाऱ्या माहोलमध्ये उपस्थित असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवण्याा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ” आयुष्यात चढ-उतार येतात; धीर सोडू नका. गेली तीन वर्षे चांद्रयानवर खडतर मेहनत घेतली आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे.”

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमध्ये ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या विद्यार्थांशी संवाद साधला. उपस्थित विद्यार्थांनी मोदींवर प्रश्नांचा पाऊस पाडला. मोदींनी धैर्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. यावेळी एका विद्यार्थाने मोदींना विचारले की, ‘दृढनिश्चयी राहण्यासाठी आम्ही काय करायला हवं’ , त्यावर ते म्हणाले की, ‘लक्ष्य मोठे ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी जोडा. जे गेलं ते सोडून द्या, त्याने निराशा येते. ती नकारात्मकता सोडून द्या’

या चर्चेदरम्यानच एका विद्यार्थाने भविष्यात भारताचा राष्ट्रपती बनायचे असल्याचे मोदींना सांगितले. हे ऐकताच मोदी यांनी त्या विद्यार्थ्याची पाठ थोपाटत शाबासकी दिली. आणि म्हणाले, ‘राष्ट्रपती का बनायचेय? पंतप्रधान का नाही बनायचे?’ मोदी यांच्या या वक्तव्यावर उपस्थित विद्यर्थी हसायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विद्यार्थांना स्वाक्षरी दिल्या. मोदी यांच्यासोबत चांद्रयान २ पाहण्यासाठी भूटानमधील विद्यार्थीही आले होते. त्यांना मोदी म्हणाले की, मी आशा करतोय तुम्हाला नवीन मित्र मिळाले असतील.

दिल्लीचा मनोज्ञ सिंह सुयांश, ओदिशाचा चिन्मय चौधरी, मेघालयचा रिबेत फावा याच्यासह एकूण ६० विद्यार्थी इस्रोच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी झाले होते. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत शनिवारी इस्रोच्या मुख्यालयात बसून चांद्रयान २ चे अवतरण बघण्याची संधी मिळाली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अवकाश कार्यक्रमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ऑगस्टमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला होता, त्यातून साठ जणांची निवड या चांद्रयान २ चे अवतरण इस्रोच्या मुख्यालयात बसून बघण्यासाठी करण्यात आली होती.