वादग्रस्त विधाने आणि सोशल मिडीयावरील अश्लिल छायाचित्रांमुळे चर्चेत राहणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिच्या हत्येचा विषय शनिवारी दिवसभर चर्चेत राहिला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुलतान येथील राहत्या घरी कंदील हिची तिच्या भावानेच हत्या केल्याचा दाट संशय आहे. कंदीलने नुकताच एका मौलवीसोबतचा मादक सेल्फी फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली होती. हाच सेल्फी तिच्या मृत्यूसाठी कारण ठरल्याची चर्चा आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून ही हत्या ऑनर किलिंगचा प्रकार असावा, असा निष्कर्ष पुढे येत आहे. मात्र, पोलिसांच्या हाती इतके ठोस पुरावे येऊनही कंदीलच्या हत्येच्या आरोपातून तिच्या भावाची निर्दोष सुटका होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगसंदर्भात असलेल्या प्रचलित कायद्यामुळे कंदीलच्या भावाला शिक्षा होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये स्त्रियांच्या हक्कांसंदर्भात जनजागृती झाली असली तरी याबाबतचे कायदे अजूनही स्त्रियांना पूर्णपणे न्याय मिळवून देणारे नाहीत. मार्च महिन्यात पाकिस्तानी सिनेटमध्ये ऑनर किलिंग विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय विधानसभेत हे विधेयक मंजूर होण्यापूर्वीच रद्द करण्यात आले. ऑनर किलिंगमधील गुन्हेगारांसाठी सध्याच्या कायद्यामध्ये अनेक पळवाटा उपलब्ध आहेत. हत्या करणाऱ्याने मृताच्या कुटुंबियांची किंवा नातेवाईकांची माफी मागितली आणि त्यांनी माफ केले, ही गोष्ट ग्राह्य धरून आरोपीला निर्दोष मुक्त केले जाते. अनेकदा हत्या करणारा कुटुंबियांपैकीच एक असतो. नातेवाईकांकडून त्याला माफ करण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे बहुतांश वेळा आरोपी मोकाट सुटतात. मानवी हक्क आयोगाच्या माहितीनुसार सन २०१४-१५ मध्ये पाकिस्तानमध्ये तब्बल २००० महिला आणि मुली ऑनर किलिंगच्या बळी ठरल्या होत्या. यामध्ये पुरूषांची संख्याही मोठी आहे. गेल्यावर्षी अशाप्रकारच्या घटनांमध्ये ८८ पुरूषांची हत्या करण्यात आली होती.
कंदीलचे झाले होते लग्न, पतीने माध्यमांसमोर केला होता गौप्यस्फोट 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंदीलने मॉडलिंग क्षेत्र सोडावे यासाठी तिचा भाऊ तिच्यावर दडपण आणत होता. कंदीलचा भाऊ वासिम याने यापूर्वी अनेकदा कंदीलला फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड न करण्याबद्दलही बजावले होते.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत “मला पाकिस्तानात सुरक्षित वाटत नाही, मी पालकांसोबत ईदनंतर परदेशात स्थायिक होणार आहे’ असेही तिने सांगितले होते. तसेच आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही तिने केली होती. तिला सतत जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत होत्या त्यामुळे आपला पत्ता तिने लपवून ठेवली असल्याचीही माहिती तिच्या हत्येनंतर पुढे आली आहे.
‘ती’ कोहलीला प्रेमाने म्हणते ‘विराट बेबी’