अयोध्येच्या जमिनीच्या प्रकरणावरुन आता काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आहे. देशाच्या राजकारणाचा मोठा भाग असूनही स्वयंसेवक संघाची नोंदणी का झालेली नाही? असा सवाल आता काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी याबाबत विचारणा केली आहे.

पवन खेडा यांनी काल उत्तरप्रदेश आणि राजस्थानमधल्या जमिनींच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांचं उदाहरण देत विचारलं की, आम्हाला हे जाणून घ्यायचंय की अजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का नाही झाली? ही संस्था इन्कम टॅक्स का भरत नाही? ते या देशाचे मालक आहेत का?

आणखी वाचा- Ayodhya Land Deal: १८ कोटींमध्ये जमीन घेतली? ; ट्रस्टने भाजपा व आरएसएसला पाठविला अहवाल

ज्या दोन प्रकरणांचं उदाहरण खेडा यांनी दिलं आहे त्यातलं एक प्रकरण म्हणजे उत्तरप्रदेशातल्या अयोध्येत राम जन्मभूमी संस्थानाने खरेदी केलेल्या मंदिरासाठीच्या जमिनीचं आहे. या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय आणि संघाचे कार्यकर्ते अनिल मिश्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मात्र दोघांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.

तर दुसरं प्रकरण ऑडियो आणि व्हिडिओ क्लिपसंदर्भातलं आहे. या क्लिप प्रसिद्ध करुन काँग्रेसने राजस्थानमधल्या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. एका खासगी कंपनीला नगरपालिकेकडून थकबाकी मिळवून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचं कमिशन मागितल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.