News Flash

Fact Check: रशियन लस इतक्यात बाजारात उपलब्ध होणार नाही कारण…

...म्हणून वेळ लागणार

फोटो सौजन्य - रॉयटर्स

करोना व्हायरसला रोखू शकणारी लस विकसित करण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. १५० पेक्षा जास्त लसी चाचणीच्या वेगवेगळया स्टेजवर आहेत. यात भारतात विकसित झालेल्या दोन लसींच्या लवकरच मानवी चाचण्या सुरु होणार आहेत. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरली असली तरी ही लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही. रविवारी प्रसिद्ध झालेल्या वेगवेळया वृत्तांमध्ये रशियाने करोनावर विकसित केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे म्हटले होते. ती लस बनवणाऱ्या सेचेनोव्ह विद्यापीठानेच तसा दावा केला होता.

लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरी ती फेज वनची चाचणी होती, ही माहिती बहुतांश बातम्यांमध्ये देण्यात आली नव्हती. या लसीच्या फेज २ च्या चाचण्या सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. फेज ३ बद्दल काहीही स्पष्टता नाहीय. इंडियन एक्स्प्रेसने ही माहिती दिली आहे.

अमेरिका, ब्रिटन, चीन आणि जर्मनी या देशांमध्ये करोनावर फक्त एकच कंपनी नाही, तर दोन ते तीन कंपन्यांकडून लस संशोधन सुरु आहे. रशियामधून मानवी चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली ही पहिली लस आहे. रशियन संरक्षण मंत्रालयासोबत मिळून गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने करोना व्हायरस विरोधात ही लस विकसित केली आहे.

१८ जूनपासून या लसीच्या फेज वनच्या ट्रायल सुरु झाल्या. लस प्रयोगासाठी सैन्य दलातूनच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. रशियाच्या TASS न्यूज एजन्सीच्या १० जुलैच्या वृत्तानुसार, फेज १ च्या क्लिनिकल ट्रायल १५ जुलै रोजी संपणार आहेत. १३ जुलैपासून फेज २ च्या ट्रायल सुरु होतील.

फेज १ ची ट्रायल म्हणजे काय?
फेज १ मध्ये स्वयंसेवकांच्या छोटया गटावर लसीची सुरक्षितता आणि साईड इफेक्ट किती झाले ते तपासण्यात आले. लस दिल्यानंतर एकाही स्वयंसेवकाने तक्रार केली नाही किंवा साईड इफेक्ट दिसले नाहीत असे संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने TASS न्यूज एजन्सीने म्हटले आहे.

फेज २ चा उद्देश काय?
“सोमवार १३ जुलैपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात लसीची परिणामकारकता आणि रोगप्रतिकार शक्ती कशा प्रकारे काम करते ते तपासले जाणार आहे”असे एजन्सीने म्हटले आहे. या टप्प्यात नागरिकांमधून निवडण्यात आलेल्या स्वयंसेवकांना सुद्धा लस देण्यात येईल.
करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी कितपत डोस पुरेसा आहे ते या टप्प्यातून समोर येईल.

तिसऱ्या फेजमध्ये काय होते?
आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय कुठल्याही लसीला सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जगातील अनेक लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. त्या सुद्धा फेज १, २ मध्ये सुरक्षित ठरल्या आहेत.

तिसऱ्या फेजमध्ये हजारो स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येते. त्यात लसीमुळे करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला चालन मिळाली आहे का? ते संशोधक तपासून पाहतात. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महिने जातात.

अन्य लसींच्या तुलनेत रशियाची लस अजून दुसऱ्या फेजमधून गेलेली नाही. हा टप्पा पार झाल्यानंतरच यशापयश ठरवता येईल.

रशियाने विकसित केलेली ही लस फेज ३ ट्रायलमध्ये जाणार का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. कारण सध्याची इमर्जन्सीची स्थिती लक्षात घेता रशियन आरोग्य यंत्रणा त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात.

फेज ३ नंतर काय होणार?
करोनावरील लस फेज ३ मध्ये यशस्वी ठरली तरी ती सर्वसामन्यांसाठी उपलब्ध व्हायला काही महिने जातील. कारण मध्ये अनेक प्रशासकीय परवानग्यांची गरज लागते.
त्यामुळेच अनेक आघाडीचे वैज्ञानिक आणि WHO चे अधिकारी लस बाजारात यायला वर्ष ते दीडवर्ष लागेल असे सांगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 6:06 pm

Web Title: why russian covid 19 vaccine take time to enter market dmp 82
Next Stories
1 …तेव्हाच भाजपा राजस्थानात बहुमत सिद्ध करायची करणार मागणी
2 स्वदेशी COVAXINची मानवी चाचणी सुरु; करोना विषाणूच्या प्रतिबंधावर महत्वपूर्ण संशोधन
3 बिहारमध्ये ३१ जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन
Just Now!
X