रशियाने करोना विरोधातली लस शोधली, त्यासंदर्भातला दावाही केला. इतकंच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या लसीला मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीलाही याच लसीचा डोस दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. करोनाविरोधात लस शोधणारा रशिया हा पहिला देश ठरला खरा.. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. मात्र या लसीविरोधात आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

का उपस्थित होते आहे शंका?
या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या इन्स्टिट्युटने अद्याप दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची संख्या जाहीर केलेली नाही. लस शोधताना हे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शोधण्यात आलेली लस किती सुरक्षित आहे? हे या दोन टप्प्यांमध्ये तपासलं जातं. WHO चं म्हणणं हे आहे की रशियाने जी लस शोधली आहे त्यासंबंधी पहिल्या टप्प्यात जी चाचणी झाली त्याचेच आकडे आहेत. WHO ने रशियाला विनंती केली आहे की जे नियम लसीसाठी घालून देण्यात आले आहेत ते पूर्ण केले पाहिजेत.

रशियाने जी लस तयार केली आहे त्याबाबत काहीशी चिंता वाटते आहे. ही लस फक्त असुरक्षितच नाही तर परिणाम न साधणारीही असू शकते असं म्हणत लॉरेन्स गॉस्टिन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गॉस्टिन हे जॉर्जटाउन विद्यापीठातले ग्लोबल पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत.

संसर्ग रोगांची जाण असलेले आणि त्यामध्ये तज्ञ असलेले अमेरिकेतील डॉक्टर अँथोनी फौसी यांनीही रशियाच्या लसीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या जलदगतीने त्यांनी करोनावरची लस कशी काय तयार केली? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर रशिया आणि चीनमध्ये लोकांना लस दिली जाते आहे. मात्र त्याबाबत सुरक्षेची काळजी घेतली जात नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे रशियाने जलद गतीने समोर आणलेल्या या लसीबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत.