सत्ताधारी काँग्रेस-जेडीएसच्या १६ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कुमारस्वामी सरकारसमोर संकट निर्माण झाले आहे. सरकार टिकणार की, नाही अशी स्थिती असताना कुमारस्वामी राजीनामा द्यायला तयार नाहीत. मी राजीनामा का देऊ? मी आताच राजीनामा देण्याची काय गरज आहे? असा उलटा सवाल कुमारस्वामी यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर केला.

आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी यांनी मी राजीनामा का देऊ ? असा प्रतिप्रश्न केला. २००९-१० साली काही मंत्र्यांसह १८ आमदार तत्कालिन मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात समोर आले होते. पण त्यावेळी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला नव्हता ही आठवण त्यांनी करुन दिली.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुरुवारी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. बुधवारी आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता १६ झाली आहे. आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेले तर बहुमतातले कुमारस्वामी सरकार अल्पमतामध्ये येईल.