कोर्टाने सांगितले की महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश दिला जावा. यानंतर प्रवेश द्यायला काही हरकत नव्हती. जर कुणाला थांबवले जात असेल तर सुरक्षा देऊन महिलांना मंदिरात प्रवेश द्यायला हवा होता. मात्र कोणाही महिलेला प्रवेश करण्याची इच्छा नाही. त्याचमुळे श्रीलंकेतून महिलांना आणून मागच्या दाराने प्रवेश दिला जातो आहे असा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. प्रयागराजमध्ये विहिंपच्या पुढाकाराने धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने महिलांच्या शबरीमला मंदिरातील प्रवेशाबद्दल निर्णय देताना हिंदूंच्या भावनांचा विचार केला नाही असंही भागवत यांनी म्हटलं आहे. अयप्पाची चार मंदिरं आहेत ज्यापैकी एक मंदिर ब्रह्मचर्य रुपात आहे. त्यामुळेच या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. ही इथली परंपरा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ माजला होता. त्यानंतर आता सरसंघचालक  मोहन भागवत यांनी या प्रकरणी  श्रीलंकेच्या महिलांना आणलं जात असल्याचा आरोप केलाय.