18 March 2019

News Flash

शोकांतिका: म्हणून स्टीफन हॉकिंगना देता आलं नाही नोबेल

संशोधनाची सत्यता पडताळता येत नाही ही समस्या

ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी अत्यंत मूलगामी संशोधन केलं आणि सृष्टीची काही कोडी उलगडण्यात मोलाची भूमिका बजावली, परंतु त्यांचा कधीही नोबेल पारितोषिकासाठी विचार झाला नाही, अगदी कृष्ण विवरं किंवा ब्लॅक होल्सचाही अंत होऊ शकतो या संशोधनासाठीही! का झालं असं?
कृष्ण विवरंही अमर्त्य नसून त्यांचाही शेवट होऊ शकतो ही त्यांची थेअरी आता भौतिकशास्त्रातही मान्यता पावलेली आहे. परंतु या थेअरीची खातरजमा करता येत नाहीस तिची सत्यता पडताळता येत नाही ही समस्या आहे, तिची सत्यता मांडणीमध्ये समजते परंतु प्रत्यक्षात बघता येत नाही ही अडचण असल्याचे टिमोथी फेरीस या लेखकानं म्हटलं आहे.

“ही कल्पना आजमावून बघण्याचा कोणताही उपाय नव्हता ही एक समस्याच होती. कृष्ण विवरांचं आयुष्य इतकं मोठं आहे की त्यांचा खरोखर मृत्यू होताना बघणं, ती संपताना बघणं हे अशक्य कोटीतलं काम आहे,” फेरीसनी नमूद केलंय. जर का कृष्ण विवरांचा मृत्यू होताना, त्यांचं अस्तित्व संपताना बघायला मिळालं असतं, त्याची पडताळणी करता आली असती तर हॉकिंगना नोबेल मिळालंही असतं असं फेरीसनी नॅशनल जिऑग्रॉफिकमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलंय.

अर्थात, कृष्ण विवरांचं आयुर्मान अब्जावधी वर्ष असल्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला त्याचं प्रत्यंतर येणं अशक्य आहे असं त्यांनी पुढे म्हटलंय.
याच कारणासाठी हिग्स बोसनची 1964 मध्ये मांडणी करणाऱ्या पीटर हिग्ज यांना अनेक दशकं नोबेलनं हुलकावणी दिली. ज्यावेळी हिग्ज बोसनची किंवा देवकणाची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली आणि हिग्ज यांचं संशोधन अनुभवाच्या कसोटीला उतरलं त्यावेळी पीटर हिग्ज व फ्राऩ्सिस एंगलर्ट यांना 2013 मध्ये संयुक्त नोबेल बहाल करण्यात आलं.

त्यामुळे महान संशोधन करूनही केवळ त्या संशोधनाच्या खातरजमेची व्याप्ती मानवी आवाक्याबाहेर म्हणजे अब्जावधी वर्षांची असल्यामुळे संशोधन पटूनही नोबेलनं दखल घेता आली नाही ही शोकांतिका आहे.

First Published on March 14, 2018 1:09 pm

Web Title: why stephen hawking could not be honored with nobel