माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देण्यात आला तेव्हा हिरवी साडी आणि हिरव्या रंगाचे जॅकेट त्यांच्या अंगावर होते. याशिवाय त्यांचे मस्तक लाल रंगाच्या ओढणीने झाकण्यात आले होते. मात्र त्यांना हिरव्या रंगाच्या साडीमध्ये निरोप देण्यामागे एक खास कारण आहे.

सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये दोन वेळा हिरव्या रंगाच्या साडीवरुन वाद झाला आहे. या वादावर एकदा त्यांना चक्क लोकसभेमध्ये स्पष्टीकरण द्यावे लागले होते. ९ डिसेंबर २०१५ रोजी परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तान दौऱ्यावर गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. यावरुन वाद झाला. पाकिस्तानला खूष करण्यासाठी स्वराज यांनी हिरव्या रंगाचा पोशाख केल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यांच्या पोशाखावरुन झालेल्या वादाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. १४ डिसेंबर रोजी स्वराज भारतामध्ये परत आल्या तेव्हा त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. “मी दर बुधवारी हिरव्या रंगाची साडी नेसते,” असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. ९ डिसेंबर २०१५ रोजी बुधवार होता.

२०१५ च्या आधी म्हणजेच २८ मे २०१४ रोजी मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दिवशी स्वराज यांनी हिरवी साडी नेसली होती. स्वराज यांनी त्याच दिवशी मंत्री पदाची शपथ घेतली होती. यावरुन वाद झाला त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा बुधवार आणि हिरव्या साडीच्या कनेक्शनबद्दल सांगितले होते. “मी बुधवारी हिरव्या रंगाची साडी नेसते आणि शपथविधीच्या दिवशी बुधवार होता,” असं स्वराज म्हणाल्या होत्या. आता तुम्हाला समजलेच असेल की ७ ऑगस्ट रोजी अंत्यंसस्कार झाले त्यावेळी स्वराज यांचे पार्थिवावर हिरव्या रंगाची साडी आणि जॅकेट होते. स्वराज यांचे निधन झाले नसते तर त्यांनी बुधवारी हिरवीच साडी नेसली असती.

दिवस आणि साडीचा रंग

सुषमा स्वराज यांच्या साड्यांची नेहमीच चर्चा व्हायची. जेव्हा त्या २००९ मध्ये विदिशा मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी घेतलेल्या एक पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या साडीसंदर्भात एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी “मी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या रंगाची साडी नेसते. यामागे माझी अशी काही स्वत:ची कारणे आहेत”, असं सांगितलं होतं. “माझे कपड्यांचे कपाट संभाळताना मला खूप त्रास व्हायचा. राजकारण्यांकडे कपड्यांची आवड-निवड जपण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळेच मी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा पेहराव करायचा हे ठरवले आणि त्यानुसार कपाट लावले आहे. या निर्णयामुळे आता मला पोशाख निवडताना कमी अडचणी येतात,” असं त्या म्हणाल्या होत्या.

कोणत्या दिवशी कोणती साडी

सुषमा यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायच्या हेही सांगिले होते. सोमवारी पांढरी किंवा क्रीम रंगाची, मंगळवारी लाल किंवा मरुन रंगाची, बुधवारी हिरव्या रंगाची, गुरुवारी पिवळ्या रंगाची, शुक्रवारी जांभळ्या (वांगी) रंगाची आणि शनिवारी नीळ्या रंगाची साडी आणि जॅकेट परिधान करायच्या. रविवारी त्या त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही रंगाची साडी आणि काळ्या रंगाचे जॅकेट परिधान करायच्या. या मागे कोणतीही अंधश्रद्धा नसून माझ्या सोयीसाठी घेतलेला निर्णय आहे असं त्या म्हणाल्या होत्या.