विख्यात लेखक आणि क्रिकेट ते समाजकारण यावरील भाष्यकार आणि प्रसिद्ध इतिहासकार असणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं मत व्यक्त केलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचाही उल्लेख केला आहे.

मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे, असं रोखठोक मत गुहा यांनी एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात व्यक्त केलं आहे. गांधींनी आता जाणं गरजेचे का आहे या मथळ्याखाली गुहा यांनी हा लेख लिहिला आहे.

आणखी वाचा- “पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा राहुल गांधींविरोधातील मोहिम; काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट”

बिहार निवडणुकीचा उल्लेख

गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये राहुल गांधी हे राजकारणासंदर्भात किती गंभीर आहेत हे सांगताना बिहार निवडणुकीचे उदाहरण दिलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये राहुल गांधी सुट्ट्यांसाठी निघून गेले होते, असं गुहा यांनी लेखात नमूद केलं आहे. राहुल यांच्या या दौऱ्याचा उल्लेख राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याही केल्याची आठवण गुहा यांनी करुन दिली आहे. तसेच पुढे बोलताना गुहा यांनी याच बाबतीत भाजपाचं कौतुक केलं आहे. गुहा लिहितात, काँग्रेसच्या उलट भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष असणारे जे. पी. नड्डा हे अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली आहे.

विचारसरणीमध्ये कमालीचा फरक

याच लेखात पुढे गुहा यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक असल्याचंही निरिक्षण नोंदवलं आहे. काँग्रेसचे जेवढे टीकाकार आहेत त्याहून अधिक भाजपाचे आहेत असं सांगताना गुहा यांनी मोदी सरकारच्या धोरणांचे विश्लेषण करत त्यावरुन भाजाच्या विचारसणीवर टीका केली आहे. मात्र पुढे लिहिताना गुहा यांनी, “मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिलं होतं. मात्र आज काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत आहे,” असा टोला काँग्रेसला लगावला आहे.

आणखी वाचा- यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?

मूळ तीन गोष्टींमध्ये फरक

काँग्रेस एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तस दुसऱ्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात, असं गुहा म्हणाले आहेत. काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये तीन मुद्द्यांवरुन खूप मोठा फरक लक्षात येतो असं गुहा यांनी लेखात म्हटलं आहे. भाजपाचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेलं नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाहीत, असं गुहा सांगतात.

गांधींनी पक्ष सोडावा

पुढील लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही तीन वर्षे बाकी आहेत. या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे. भविष्यातील नेतृत्व पक्षबांधणीच्या माध्यमातून समोर आणलं पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे, असं गुहा यांनी म्हटलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखात स्पष्टपणे गांधी कुटुंबाने केवळ काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वावरुनच नाही तर पक्षापासूनच दूर जाण्याची गरज असल्याचे संकेत दिलेत.