उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशात राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी योगी सरकारला या मुद्यावरून धारेवर धरलं आहे. तर, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिलेले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता बसपा अध्यक्ष मायावती यांनी पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत यूपी सरकार गप्प का? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.

“हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबाने जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर (डीएम) धमकी देण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. तरी देखील उत्तर प्रदेश सरकारचे रहस्यमयरित्या गप्प राहणे दुःखद व अतिशय चिंताजनक आहे. खरंतर सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी तयार झाले आहे, मात्र ते जिल्हाधिकारी तिथे असताना या प्रकरणी निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? लोकं साशंक आहेत.” असं मायावतींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या अगोदर मायावती यांनी “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर संपूर्ण देशात आक्रोश आहे. सुरूवातीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीतून लोकं समाधानी नाहीत.” असे सांगत या घटनेची सीबीआयतर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तसेच, मायावतींनी आणखी एक ट्विट करत राष्ट्रपतींनी ही या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती.