मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इराणमध्ये मोठया प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेने शुक्रवारी ड्रोन हल्ला केला. त्यामध्ये कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. तेहरानमधून ज्या बातम्या येत आहेत, त्यानुसार इराण सरकारमधील सर्वोच्च नेतृत्वाने अमेरिकेला धडा शिकवण्याचे पर्यायांचा विचार सुरु केला आहे.

कासिम सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांचे निकटवर्तीय वर्तुळातील होते. त्यामुळे सुलेमानी यांचा मृत्यू खोमेनी यांच्यासाठी एक झटका आहे. इराणने प्रत्युत्तर दिल्यास ती थेट युद्धाची घोषणा असेल असे तज्ञांचे मत आहे. सर्वच आखाती देशांमध्ये याचे दूरगामी परिणाम होतील. इराणच्या प्रत्युत्तरानंतर उदभवणाऱ्या परिस्थितीसाठी अमेरिका कितपत तयार आहे ते सुद्धा समजणार आहे.

तणावाला सुरुवात कशी झाली?
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबरोबर अण्वस्त्र करार केला होता. या करारातून डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध आणले. भारतासह मित्र देशांना इराणकडून तेल खरेदी बंद करायला लावली. त्यानंतर मागच्या काही महिन्यात सौदीचे तेल टँकर आणि तेल प्रकल्पावर हल्ले झाले. या सर्वांमागे इराणच असल्याचा अमेरिकेचा स्पष्ट आरोप होता. इराणने अमेरिकेचे मानवरहीत ड्रोन विमान सुद्धा पाडले. त्यावेळी सुद्धा अमेरिकेने हल्ल्याची तयारी केली होती. पण अखेरच्या क्षणी ट्रम्प यांनी माघार घेतली. आता अमेरिकेने थेट इराणच्या टॉप कमांडरला संपवले आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी भडकणार आहे.

आणखी वाचा – कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेणार, इराणची प्रतिज्ञा

ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला?
अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग सुरु आहे तसेच यावर्षी २०२० मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणूक आहे. महाभियोग आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सक्षम, मजबूत आणि निर्णय घेण्याची धडाडी असलेला नेता आहोत, हा संदेश देण्यासाठी ट्रम्प यांनी इतके आक्रमक पाऊल उचलले असावे असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.