‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटावरुन आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसने या चित्रपटात दाखवलेल्या घडामोडी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे सांगत यावर आक्षेप घेतला आहे. तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दाखवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा पवित्रा घेतला आहे. यावर या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मध्यवर्ती भुमिका साकारलेले अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया देताना एक सवाल उपस्थित केला आहे. ज्या पुस्तकावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. ते चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाले त्यावेळी कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही, मग आत्ताच का घेतला जातोय, असे त्यांनी म्हटले आहे.

खेर म्हणाले, काँग्रेसचे लोक या चित्रपटाला जितका विरोध करतील तितक्या अधिक प्रमाणात ते या चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देतील. ज्या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे ते पुस्तक २०१४ मध्ये प्रकाशित झाले. त्यावेळी कोणताही निषेध करण्यात आला नाही. मग आत्ताच का केला जात आहे.

राहुल गांधींनी नुकतेच एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्यावर भाष्य केले होते. त्यामुळे काँग्रेसचे जे लोक या चित्रपटाला विरोध करीत आहेत त्यांना राहुल गांधींनी खडसावले पाहिजे आणि सांगितले पाहिजे की, आपण चुकीचं बोलत आहात, अशा शब्दांत अनुपम खेर यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे.

खेर पुढे म्हणाले, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी याचे स्वागत करायला हवे. तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. कारण, यात असेही डायलॉग आहेत जे मनमोहन सिंग यांचं महानत्व सिद्ध करतात.

दरम्यान, जालियनवाला बाग हत्याकांड आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरने केलेल्या वंशहत्या अशा बाबींवर चित्रपट बनवताना आपण त्यातील तथ्ये बदलू शकत नाही. तोच नियम ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’बाबतही लागू होतो, अशा शब्दांत त्यांनी या चित्रपटाचे समर्थन केले आहे.