आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने नवऱ्याला रॅम्पवरून फरफटत नेण्याची पाळी एका महिलेवर आली. तिला एका हाताने भिंतीचा आधार घेत दुसऱ्या हाताने नवऱ्याला ओढतओढत वरच्या मजल्यावर न्यावे लागले. रुग्णालयात व्हिलचेअर अथवा स्ट्रेचर उपलब्ध नव्हता. हे प्रकरण समोर येताच राज्य सरकारने या घटनेच्या तपासाचे आदेश देत, रुग्णालय व्यवस्थापनाला अधिक व्हिल चेअरची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

हा सर्व प्रकार उपस्थितांपैकी काहीजणांनी फोनमध्ये शूट केला. श्रीवाणी नावाची ही महिला नवऱ्याला एकटीच रॅम्पवरून ओढत ओढत वरच्या मजल्यावर नेत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. उपस्थितांपैकी कोणीही तिच्या मदतीला पुढे न आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. श्रीवाणीचा पती श्रीनिवासाचार्य जमिनीवर घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते चालू शकत नाहीत. दुखापतग्रस्त पायावरील अपचारासाठी त्यांना या रुग्णालयात आणण्यात येते. वरच्या मजल्यावर नेण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने नवऱ्याला दाराने वर नेण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. त्यामुळे त्यांना अशाप्रकारे वरच्या मजल्यावर नेण्याची पाळी आपल्यावर असल्याचे श्रीवाणीने सांगितले.

रुग्णालयात दोन व्हिलचेअर आणि एक स्ट्रेचर असून थोड्याच वेळात ते उपलब्ध होणार असल्याने श्रीवाणीला काही काळासाठी स्वागतकक्षात थांबून वाट पाहाण्यास सांगण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु श्रीवाणीने वाट पाहाण्यास नकार दिल्याचा खुलासादेखील रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आला. पायावरील उपचारासाठी आपल्या पतीला नेहमी याच रुगणालयात आणत असून, दरवेळी इथे व्हिलचेअर उपलब्ध नसल्याचा अनुभव श्रीवाणीने कथन केला. राज्य सरकारने या सर्व प्रकाराचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ओडिशामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. एका आदिवासी व्यक्तीस आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून वाहावा लागला होता. दाना माझी नावाच्या या व्यक्तिकडे शववाहिनीचे भेडे देण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून खांद्यावरून वाहावा लागला होता.