‘पती आपल्या पत्नीला स्वतःसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही’ अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. एका महिलेने आपल्या पतीवर क्रूरतेचा आरोप केला होता, याबाबत फौजदारी खटला सुरू होता. या खटल्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील मत स्पष्ट केलं आहे.
महिलेने केलेल्या आरोपात, ‘मी त्याच्यासोबत राहावं अशी पतीची इच्छा आहे, पण मला त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाहीये’ असं म्हटलं होतं. महिलेच्या आरोपावर सुनावणी करताना न्यायाधीश मदन बी लोकुर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने कोर्टाने पतीला फटकारलं. पत्नी म्हणजे एखादी वस्तू नाहीये. त्यामुळे तिच्यासोबत राहण्याची इच्छा असेल तरीही पती आपल्या पत्नीवर त्यासाठी दबाव आणू शकत नाही.
न्यायाधीश मदन बी लोकुर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने न्यायालयात उपस्थित असलेल्या पतीला, ‘पत्नी म्हणजे एखादी वस्तू नाहीये, तुम्ही तिच्यावर बळजबरी करू शकत नाही. तिला तुमच्यासोबत राहायचं नाहीये, तरीही तिच्यासोबतच राहायचंय असं तुम्ही कसं काय म्हणू शकतात’ असा सवाल पतीला केला. पत्नीसोबतच राहाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा असंही सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पतीला सुचवलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 2:49 pm