News Flash

पत्नी काही पतीची मालमत्ता नाही, सोबत राहण्यासाठी तिच्यावर बळजबरी करता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

पत्नी काही एखादी वस्तू नाहीय, असंही न्यायालयाने म्हटलं आहे

संग्रहित छायाचित्र (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशामध्ये पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नसल्याचे म्हटले आहे. पतीसोबत राहण्याची पत्नीची इच्छा नसेल तरी पत्नीने आपल्या सोबतच रहावे असा दबाव पती तिच्यावर टाकू शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका व्यक्तीने दाखल केलेल्य याचिकेसंदर्भात सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवलं आङे. याचिका करणाऱ्या पतीने, माझ्या पत्नीने पुन्हा माझ्यासोबत रहावे आणि पुन्हा आम्ही एकत्र संसार करावा, अशी मागणी केली होती.

सर्वोच्च न्यालायलामधील न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने याचिकाकर्त्याला यासंदर्भात खडे बोल सुनावले. “तुम्हाला काय वाटतं?, पत्नी काय एखादी वस्तू आहे का. की आम्ही तिला अशाप्रकारचा आदेश देऊ. पत्नी काय मालमत्ता आहे का. तिने तुमच्यासोबत जाण्याचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो?,” असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला.

गोरखपुरमधील एका कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यामधील (एचएमए) कलम ९ नुसार पुरुषाच्या पक्षामध्ये संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या मुद्द्याच्या आधारावर १ एप्रिल २०१९ रोजी आदेश दिला. पत्नीने तेव्हा कौटुंबिक न्यायलयामध्ये दिलेल्या माहितीनुसार सन २०१३ मध्ये लग्न झाल्यापासून पती हुंड्यासाठी माझा झळ करत होता. त्यामुळेच मला त्यांच्यापासून दूर व्हावं लागलं, असं या महिलेने न्यायालयाने सांगितलं. सन २०१५ मध्ये या महिलेने न्यायालयामध्ये पोटगीसाठी अर्ज केला. त्यानुसार गोरखपुर न्यायालयाने या महिलेच्या पतीला महिन्याला २० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले. यानंतर या पतीने कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आपले मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी केली.

गोरखपुरमधील कौटुंबिक न्यायालयाने दुसऱ्यांदाही आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर पतीने अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर पतीने थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.  आपली बाजू मांडताना या महिलेने आपले वकील अनुपम मिश्रा यांच्या माध्यमातून न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून पतीचे हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान पतीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाने या महिलेने तिच्या पतीसोबत परत जावं असा आदेश दिला पाहिजे असं मत नोंदवलं.

न्यायालयाने संविधानातील अधिकारांच्या संरक्षणाचा पतीच्या याचिकेमधील मुद्दा फेटाळून लावला. अलहाबाद न्यायालयाने पोटगीसंदर्भातील आदेश दिल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.  “तुम्ही इतके बेजबाबदार कसे असू शकता? ते महिलेसोबत एखादी संपत्ती असल्याप्रमाणे वागत आहेत. ती काही वस्तू नाहीय,” अशा शब्दांमध्ये न्यायालयाने पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलाला सुनावले. बळजबरी करुन महिलेला पतीसोबत राहण्याची सक्ती करु शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. तसेच यासंदर्भात आम्ही आदेश देण्याचा काही प्रश्नच येत नाही असंही खंडपीठाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 8:17 am

Web Title: wife not husband chattel can not be forced to live with him says supreme court scsg 91
Next Stories
1 “आणीबाणी लावणं एक चूक होती, पण…”; राहुल गांधींचं मोठं विधान
2 पंतप्रधानांचे कौतुक थांबवा!
3 जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या लसनिर्मितीची प्रशंसा
Just Now!
X