पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल या लष्करात लेफ्टनंट पदावर दाखल झाल्या आहेत.

शनिवारी एका विशेष समारंभात कौल यांनी लष्करी सेवेत प्रवेश केला. लष्कराचे उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी त्यांना लष्करी गणवेशाची मानचिन्हे प्रदान केली. संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर येथील शाखेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबतची चित्रफीत ट्विटरवर जारी केली  असून कौल यांच्या भारतीय लष्करातील प्रवेशाचे स्वागत करण्यात आले आहे.

‘‘मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचा पुलवामात २०१९ मध्ये झालेल्या  हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. आज त्यांच्या पत्नी निकिता कौल या लष्करात दाखल झाल्या आहेत, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे ’’, असे उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी म्हटले आहे.

नेटकऱ्यांपैकी स्वप्नील पांडे यांनी म्हटले आहे, की ‘‘ही घटना महत्त्वाची आहे कारण आमचे लष्कर जवानांच्या कुटुंबीयांना कधीच एकटे सोडत नाही. आता कौल यांनी लष्करी गणवेश परिधान केला आहे. लष्कराच्या मूल्यांबाबत बोलावे तितके थोडे आहे.’’

कौल यांच्या लष्कर प्रवेशाचे अनेकांनी स्वागत केले असून त्यांच्या पतीलाही श्रद्धांजली वाहिली आहे. दिवंगत पतीला हीच योग्य श्रद्धांजली ठरेल, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. मेजर धौंडियाल यांना मरणोत्तर ‘शौर्य चक्र’ देण्यात आले होते.

विवाहानंतर नऊ महिन्यांत पतीवियोग 

पतीच्या निधनानंतर २९ वर्षीय निकिता कौल यांनी तमिळनाडूतील एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून  लष्करात प्रवेश केला आहे. लेफ्टनंट पदावर त्या रुजू झाल्या असून त्या मूळ काश्मीरच्या निवासी आहेत. त्यांचा विवाह मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्याशी झाला होता, त्यानंतर नऊ महिन्यांतच जैश-ए-महंमदने केलेल्या पुलवामा हल्ल्यात धौंडियाल यांना वीरमरण आले.

बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरीवर पाणी

धौंडियाल हे मूळ डेहराडूनचे होते.  निकिता यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून पतीच्या स्मृतीसाठी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. संरक्षण गुप्तचर संस्थेचे लेफ्टनंट जनरल के.जे.एस ढिल्लाँ यांनी ट्विट संदेशात कौल यांचे अभिनंदन केले.