नवऱ्याने मारहाण केल्यामुळे बायकोने कोर्टाची पायरी चढल्याच्या बातम्या कायमच आपल्या कानावर येतात. पण पत्नीच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी चक्क पतीने कोर्टात धाव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीमुळे ९० टक्के शारीरिक अपंगत्व आले आहे आणि माझ्या जिवाला धोका असल्याचा आरोप संजीव शर्मा यांनी कोर्टात केला होता.

दिल्ली कोर्टानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुरक्षा दिली आहे. तसेच कोर्टाने स्थानिक उपजिल्हाधिकाऱ्याला सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पत्नी करत असलेली मारहाण आणि कथित शिव्यांवर लक्ष ठेण्यास सांगितले आहे.

दिल्ली कोर्टातील न्यायाधीश नजमी वजिरी यांच्या खंडपीठानं संजीव शर्मा यांना न्याय दिला आहे. कोर्टाने संजीव शर्मा यांना पत्नीशी चर्चा करून वाद सोडवण्याचा सल्लाही दिला आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही असेही कोर्टाने सुनावले आहे. सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

संजीव शर्मा यांच्यातर्फे कोर्टात वकील आदित्य अग्रवाल यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. संजीव शर्मा यांची पत्नी मुलांना आणि त्यांना मारहाण करते. तसेच त्यांच्या तीन गाड्यांचीही पत्नीनं तोडफोड केल्याचा आरोप कोर्टात करण्यात आला. संजीव शर्मा यांच्या पत्नीला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दोघांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.