देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक राजकारणात प्रवेश करत आहेत. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारणात येण्याचा किंवा कोणताही राजकीय पक्ष सुरु करण्याचा कोणतीही इच्छा नाही. आपण जर राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं तर बायको सोडून देईल असं त्यांचं म्हणणं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती की, लोकसभा निवडणुकीत जर विरोधी पक्षांचं सरकार आलं तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र रघुराम राजन यांनी आपल्यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपण जिथे आहोत तिथे प्रचंड आनंदी असून राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच रघुराम राजन यांनी आपण राजकारणात आल्यास कौटुंबिक आयुष्यात समस्या निर्माण होतील असंही त्यांना वाटत आहे.

आपण जर राजकारणात आलो तर माझी पत्नी मला सोडून देईल आणि माझ्यासोबत राहणारही नाही असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. यासोबतच राजकारण सगळीकडून सारखंच असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रघुराम राजन यांनी आपलं पुस्तक ‘द थर्ड पिलर’च्या प्रकाशनावेळी सांगितलं होतं की, मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे. पण माझ्यासाठी एखादी संधी असेल तर मला तिथे उपस्थित राहणं आवडेल. रघुराम राजन सध्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकवत आहेत.