२०१९ मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना २०१९ निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न विचारला. यावर ‘हो नक्कीच’ असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. २०१९ निवडणूक जवळ आली असून त्यानिमित्ताने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट आहे. मात्र राहुल गांधी यांनी प्रथमच जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.

भाजपा, आरएसएसकडून प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात असून काँग्रेसने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत असं राहुल गांधी बोलले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करत काही प्रश्न विचारले.

कर्नाटकाच मुख्य प्रश्न आहे की, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचं तिकीट का देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींना स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार का मिळाला नाही ? याचं उत्तर त्यांनी द्यावं. तसंच रेड्डी ब्रदर्सना तिकीटं का देण्यात आली आहेत. ३५ हजार कोटींचा घोटाळा करत त्यांनी सामान्यांचे पैसे लाटले असताना उमेदवारी कशासाठी हा सवाल राहुल गांधींनी विचारला.

नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मग ते का झालं नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी तरुणांना दिलं पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत जर काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते तर मग मोदी सरकार ते का देऊ शकत नाही ? असा सवाल विचारला.