भारत आणि चीनसारखे देश अमेरिकेकडून नोकऱ्या हिसकावून घेत असल्याचा आरोप अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या नोकऱ्या अमेरिकेतील नागरिकांसाठी आणण्याचा निर्धारही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

आफ्रिकी वंशाच्या अमेरिकेतील नागरिकांचा आपल्याला भरघोस पाठिंबा मिळेल, असे भाकीत वर्तविताना ट्रम्प यांनी वरील वक्तव्य केले. भारत, चीन, मेक्सिको, जपान आणि व्हिएतनामकडून आपण या नोकऱ्या अमेरिकेतील नागरिकांसाठी परत आणू याची खात्री असल्यानेच आफ्रिकी वंशाचे अमेरिकेतील नेते, आपल्या जनतेला ट्रम्प आवडत असल्याचे वक्तव्य करीत आहेत, याकडे या वेळी ट्रम्प यांनी लक्ष वेधले.

आफ्रिकी वंशाच्या अमेरिकेतील नागरिकांसाठी आपल्याला भरीव काम करावयाचे आहे, या वंशाचे ५८ टक्के युवक बेरोजगार आहेत. ट्रम्प यांनी आतापर्यंत चीन, जपान, मेक्सिको आदी देशांवर  टीका केली आहे. भारताची कामगिरी उत्तम आहे, त्याबद्दल कोणीच बोलत नाही, असे वक्तव्य गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी केले होते.