कठुआ येथे चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर जम्मू काश्मीर सरकार खडबडून जागं झालं आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जम्मू काश्मीर सरकार अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी नवा कायदा आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे.

बलात्कार पीडित चिमुरडीला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देताना मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट केलं की, ‘मला देशवासियांना आश्वस्त करायचं आहे की, मी फक्त बलात्कार पीडित चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी बांधील नसून, माणुसकीला काळीमा फासत या गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठीही वचनबद्ध आहे’.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘पीडित चिमुरडीला जे सहन करावं लागलं ते इतर कोणत्याही चिमुरड्यासोबत होऊ देणार नाही. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी नवा कायदा आणू. ज्यामुळे हे अखरेचं प्रकरण असेल’.

कठुआ बलात्कार प्रकरणामुळे जम्मू काश्मीर सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. याआधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी योग्य कार्यपद्दतीचं अवलंबन केलं जाईल असं म्हटलं होतं. ‘काही लोकांच्या बेजबाबदार वागणं आणि वक्तव्यांच्या आधारे कायदा आपलं काम करणार नाही. योग्य कार्यपद्धतीचा अवलंब केला जाईल. तपास गतीने सुरु असून लवकरच न्याय मिळेल’, असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं होतं.