16 February 2019

News Flash

सत्तेत आल्यास विष्णू मंदिर बांधू – अखिलेश यादव

अखिलेश यादव यांनी आपण सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशात भगवान विष्णूच्या नावाने एक मोठं शहर विकसित केलं जाईल अशी घोषणा केली आहे

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव. (संग्रहित)

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी मंदिर राजकारणाला सुरुवात झाली असून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपण सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशात भगवान विष्णूच्या नावाने एक मोठं शहर विकसित केलं जाईल तसंच तिथे एक भव्य मंदिरही असेल अशी घोषणा केली आहे. हे मंदिर कंबोडियामधील जगप्रसिद्ध अंकोरवाट मंदिराप्रमाणे असेल असंही त्यांनी सांगितलं.

‘आम्ही भगवान विष्णूच्या नावे लायन सफारीजवळ (इटावह) असणाऱ्या 200 एकर जमिनीवर शहर विकसित करु. येथे एक भव्य विष्णू मंदिर असेल. हे मंदिर कंबोडियामधील अंकोरवाट मंदिराप्रमाणे असेल’, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे.

भाजपा नेता आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी संसदेच्या मार्गाचा वापर केला जाऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतरच अखिलेश यादव यांनी ही घोषणा केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर उत्तर देण्याचं टाळत अखिलेश यादव यांनी भगवान विष्णूच्या नावे भव्य शहर उभारण्याची घोषणा केली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, यासाठी तज्ञांची एक टीम कंबोडियाला पाठवली जाईल. हे शहर आपल्या संस्कृती आणि ज्ञानाचं प्रतीक असेल. पुढे बोलताना त्यांनी भाजपावर टीका करत षडयंत्र रचणाऱ्यांचा पक्ष असून लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करत असल्याचं म्हटलं.

First Published on August 23, 2018 2:37 am

Web Title: will built vishnu temple if comes in power says akhilesh yadav