मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील बोटीची तपासणी अधांतरी

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीची तपासणी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याची अभियोजन पक्षाची विनंती नाकारण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला पाकिस्तान सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

एलईटीच्या दहशतवाद्यांनी मुंबई हल्ल्यासाठी वापरलेल्या ‘अल-फौझ’ या बोटीची तपासणी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याची आमची विनंती दहशतवादविरोधी न्यायालयाने १३ जानेवारीला फेटाळली होती. त्या निर्णयाला आम्ही इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, असे अभियोजन पक्षाचे प्रमुख चौधरी अझहर यांनी सांगितले.

हल्ल्याच्या ज्या सात आरोपींविरुद्ध सध्या खटला सुरू आहे, त्यांच्याविरुद्धचा महत्त्वाचा पुरावा असलेली ही बोट या प्रकरणातील मालमत्ता (केस प्रॉपर्टी) करण्यात यावी, तसेच कराची बंदरातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या या बोटीच्या तपासणीसाठी सरकारी आयोग स्थापन करण्यात यावा, असे सरकारने याचिकेत म्हटले आहे. यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालय काय निर्णय देते, यावर बोटीचा तपास अवलंबून राहणार आहे.