बांगलादेशात अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असले तरीही नव्याने निवडून आलेल्या शेख हसीना सरकारला सहकार्य करणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
बांगलादेश सरकारला आम्ही सहकार्य सुरूच ठेवणार असलो तरी त्याच वेळी निवडणुकीच्या विश्वासार्हतेबाबतची चिंता आम्हाला भेडसावतच आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारी हार्फ यांनी म्हटले आहे.
बांगलादेशात निवडणुका होताच आम्ही त्याच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि जनमताचे प्रतिबिंब उमटेल अशा मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका घेण्याचे आवाहन केले होते. निवडून आलेल्या सरकारला आम्ही सहकार्य करणार असलो तरी या निवडणुकांबाबत आम्ही नाराजी व्यक्त केली आहे, असेही हार्फ म्हणाल्या.
बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीबाबत आमच्या मनात प्रश्नचिन्ह आहे, कारण बहुसंख्य ठिकाणी निवडणुकाच झाल्या नाहीत किंवा काही ठिकाणी नावापुरतेच विरोधी पक्षांचे अस्तित्व होते. त्यामुळे हे मळभ दूर होईपर्यंत आमच्या मनात चिंता राहीलच, असेही हार्फ म्हणाल्या.
बांगलादेशमध्ये ५ जानेवारी रोजी निवडणुका झाल्या त्यामध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा हिंसाचाराचा उद्रेक झाला. या हिंसाचारात १८जण ठार झाले तर १००हून अधिक मतदान केंद्रे जाळण्यात आली.