केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. जर कोणी ठेकेदाराने माझ्या खासदार निधीतून होणाऱ्या कामात अपहार केला तर त्याचा गळा कापू, त्याला तुरूंगात धाडू, अशी धमकीच त्यांनी आरा (बिहार) या त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमात दिली. एका केंद्रीय मंत्र्याने अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्राच्या वीज योजना योग्यरितीने पूर्ण केल्या जातील. जर या कामात अनियमितता दिसून आली तर संबंधित व्यक्तीचा गळा कापू, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तुरूंगात टाकू, असे ते म्हणाले. प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेले निवृत्त आयएएस अधिकारी सिंह यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

बिहारमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपचे युती सरकार सत्तेवर आहे. नितीश कुमार यांनी मागील वर्ष लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसची साथ सोडत नवे सरकार स्थापन केले होते. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरा येथे १.२५ लाख कोटींच्या विकास योजनांची घोषणा करत बिहारचा चेहरा बदलून टाकू असे आश्वासन दिले होते.

माजी नोकरशहा असलेले आर. के. सिंह यांनी २०१३ मध्ये राजकारणात पर्दापण केले होते. २०१४ मध्ये त्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. बिहारमधील आरा मतदारसंघातून ते निवडूनही आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच खासदार झालेल्या सिंह यांना मंत्री केले.

ज्यात अधिकाधिक लोकांना फायदा होईल, अशा विकास योजना असाव्यात. टेंडर हे दक्षतेवर आधारित असावेत आणि त्याची निर्मिती ही गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे, असे ते म्हणाले. वर्ष २०१५ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपची वाईट कामगिरी झाली होती. त्यावेळी सिंह यांनी तिकीट वाटपात गडबड झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना टीका सहन करावी लागली होती.