मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यातील उद्योग व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या कंपन्या आणि उद्योगांना 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याची अट ठेण्यात आली आहे. दरम्यान यासंबंधी विचारलं असता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण कमलनाथ यांच्यासोबत याबद्दल चर्चा करु असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांमुळे मध्य प्रदेशात बेरोजगारी असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं आहे. ‘मध्य प्रदेशातील लोक बेरोजगार राहतात आणि युपी-बिहारमधील लोक येथील नोकऱ्या बळकावतात’, असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. यासंबंधी विचारलं असता आपण कमलनाथ यांच्याशी चर्चा करु असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताच कमलनाथ यांनी राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी योजना जाहीर केली आहे. मात्र त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. जर गुंतवणूक करणारे उद्योग, कंपनी मध्य प्रदेशातील 70 टक्के लोकांना रोजगार देणार असेल तरच त्यांना सवलत दिली जाईल असं कमलनाथ यांनी सांगितलं आहे.

कमलनाथ यांनी राज्यात त्याच उद्योग आणि कंपन्यांना सवलीतीची मुभा दिली जाईल ते 70 टक्के भूमिपुत्रांना रोजगार देतील. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधूनल लोक येतात आणि नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. यामुळेच मी या नव्या नियमाच्या फाइलवर स्वाक्षरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन तासातच कमलनाथ यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. पद हाती घेताच तीन तासाच्या आत त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. सध्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. यामुळे 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.