अहमदाबाद : इस्रायल शेती तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन या देशाने शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवला असून शेतीला उत्तम बनवले आहे. इस्रायलला शेतीतील अनेक पर्यायांची माहिती आहे. त्यांनी सिंचन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर खूपच महत्वाचा आहे. २०२२पर्यंत आम्ही भारतातही शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत गुजरातमधील वद्राद येथील सेंटर ऑफ एक्सलेंस येथे बोलत होते.

भारत दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी अहमदाबाद ते साबरमती आश्रम असा भव्य रोड शो केला आणि साबरमती आश्रमाला भेट दिली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेतान्याहू यांनी पतंगबाजीही केली. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम असा भव्य रोड शो करत दोन्ही नेते साबरमती आश्रमात पोहोचले. आश्रमात त्यांनी महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केल्यानंतर आश्रमात फेरफटका मारला. आश्रमात त्यांनी चरखा देखील चालवला. यानंतर मोदींनी नेतान्याहू यांच्यासोबत पतंगबाजी केली. पतंगविषयी नेतान्याहू यांनी मोदींना काही प्रश्नही विचारले. यानंतर दोन्ही नेत्यांनी पतंग उडवला.

त्यानंतर अहमदाबाद जिल्ह्यातील डिओ धोलेरा गावात उभारण्यात आलेल्या iCreate सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या हस्ते झाले, यावेळी नेत्यानाहू यांनी जय हिंद! जय भारत! जय इस्रायल! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद. अशा शब्दांत बुधवारी इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू यांनी भारत-इस्रायल मैत्रीची नवा नारा दिला. द्विपक्षीय संबंध वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चेसाठी त्याचबरोबर भारतातील आपल्या जंगी स्वागतासाठी नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.