काळा पैसा परत आणण्याचा मुद्दा अतिशय गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. तरीही आपला गट यासंबंधीत वेगाने चौकशी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. शाह यांनी बुधवारी सांगितले. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी शाह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अन्वेषण गट स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर शाह यांनी या गटाबाबत आपले मत मांडले.
काळा पैशाची चौकशी करण्याचा मुद्दा अतिशय गुंतागुंतीचा आहे. चौकशी सुरू केल्यानंतर मला कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण सर्व मुद्द्यांचा विचार करून लवकरात लवकर चौकशी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे शाह यांनी सांगितले. ही चौकशी लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. याआधीही माझ्याकडे चौकशीची जबाबदारी असलेल्या मुद्द्यांचा तपास लवकरात लवकर करून दोन महिन्यांच्या आता अंतरिम अहवाल सादर करण्याचे काम आपण केले असल्याचे शाह म्हणाले.