लखनऊ : भारत हा विविध संस्कृती व परंपरांनी नटलेला देश असून  या देशात समान नागरी कायदा लागू करणे चुकीचे आहे, त्यामुळे या कायद्याविरोधात आपण आधीपासून जनमत तयार करण्याचा प्रयत्न करू, असे मत अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी व्यक्त केले आहे. मंडळाची आभासी बैठक नुकतीच झाली त्यात समान नागरी कायद्याला कसून विरोध करण्याचे ठरवण्यात आले.

जिलानी यांनी सांगितले की, समान नागरी कायदा व बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी काही महत्त्वाचे निर्णय ११ व १३ ऑक्टोबरच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने आता समान नागरी कायदा  करणे हा एकच मुद्दा पूर्ण करायचा राहिला आहे त्यामुळे त्या दिशेने त्यांचे  प्रयत्न सुरू आहेत. समाजातील विविध गटांशी संपर्क साधून आम्ही समान नागरी कायद्याविरोधात जनमत तयार करणार आहोत. त्यासाठी मतैक्य घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. भारत हा विविध संस्कृती व सभ्यतांचा देश असून समान नागरी कायदा लागू करणे अन्यायकारक आहे.

बाबरी निकालास आव्हान देण्याची तयारी

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार असून मंडळाचा प्रतिनिधी यावर उच्च न्यायालयात अपील दाखल करील, असेही त्यांनी सांगितले.