पंजाबमधील होशियारपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला गांधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मुलीवर बलात्कार झाला हे पंजाब सरकारने मान्य केलंय. उत्तर प्रदेशात तसं झालं नाही, पीडित मुलीच्या परिवाराला धमकवण्यात आलं आणि त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्यात आलं. जर पंजाबमध्ये असा प्रकार झाला तर मी न्याय मिळवून देण्यासाठी तिकडेही जाईन अशा आशयाचं ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपाला फटकारलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी होशियारपूर बलात्कार प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. “मला काँग्रेस पक्षाला विचारायचं आहे की जिथे तुमचं सरकार नाही तिथे बलात्कार झाला तर तुम्ही बहीण-भाऊ कारने त्या ठिकाणी जाऊन पिकनिकसारखं प्रदर्शन करता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये बलात्कारची घटना घडली, एका मुलीची हत्याही झाली. तरीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शांत का आहेत? प्रत्येक घटनेवर ट्विट करणारे राहुल गांधी होशियारपूरबाबत शांत का बसले आहेत? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे म्हणून ते गप्प बसलेत का?” निर्मला सीतारामन यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोषींना शिक्षा दिली जाईल असं आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिलं आहे.

हाथरस बलात्कार प्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवलं होतं. राहुल आणि प्रियंका यांना झालेली धक्काबुक्की प्रसारमाध्यमांवर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यात आली. ज्यानंतर राहुल आणि प्रियंका यांना पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.