सोशल मीडिया आणि खासकरुन ट्विटरवर लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आपल्या हजरजबाबी उत्तरामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या भन्नाट उत्तरामुळे सुषमा स्वराज पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सुषमा स्वराज यांनी ट्विटरकराला दिलेल्या उत्तराचं लोक कौतुक करत आहेत.

ट्विटरवर एका युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी ज्वालामुखीला विचारावं लागेल असं म्हटलं आहे.

झालं असं की एका व्यक्तीने ट्विटरवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इंडोनेशियामधील भारतीय दुतावास आणि बालीमधील काऊन्सिल जनरलला टॅग करत एक सल्ला मागितला होता. या व्यक्तीने ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान इंडोनेशियामधील बालीमध्ये प्रवास करणं सुरक्षित आहे का ? सरकार यासंबंधी काही माहिती देणार आहे का ? यावर सुषमा स्वराज यांनी यासाठी मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल असं उत्तर दिलं.

सुषमा स्वराज यांच्या उत्तराला ११ हजाराहून जास्त जणांनी लाइक केलं असून दोन हजारापेक्षा जास्त रिट्विट झालं आहे. काहीजणांनी सुषमा स्वराज यांच्या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं असून, काहीजणांनी कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नयेत असं मत व्यक्त केलं आहे.