भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी काल नियुक्ती झाल्यानंतर आज अनुपम हाजरा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. “जर मला करोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन” असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

२४ पगगणा जिल्यातील बरुईपूर येथे रविवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हाजरा आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मास्क लावले नव्हते तसेच फिजिकल डिस्टंसिंगचे पालनही केले नव्हते. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस अनुपम हाजरा म्हणाले, “आमचे कार्यकर्ते कोविड-१९ पेक्षा अधिक मोठ्या संकटाशी म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्यासोबत लढत आहेत. त्यांना अद्याप करोनाची बाधा झालेली नाही त्यामुळे त्यांना कोणाचीही भीती नाही.”

हाजरा पुढे म्हणाले, “जर मला करोनाची बाधा झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. या महामारीच्या पीडितांसोबत त्या खूपच चुकीच्या वागल्या आहेत. पीडितांचे मृतदेह केरोसीन टाकून जाळण्यात आले. आपण अशा प्रकारे कुत्री किंवा माजरांसोबतही वागत नाही.” हाजरा यांच्या या विधानानंतर तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया देताना त्यांचं हे विधान म्हणजे मानसिकदृष्ट्या अपरिपक्वतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.

हाजरा मानसिदृष्ट्या अपरिपक्व – तृणमूल काँग्रेस</strong>

हाजरा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना तृणमुल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “अशा प्रकारचं विधान तीच व्यक्ती करु शकते जी वेडी किंवा अपरिपक्व असते. मानसिदृष्ट्या चांगल्या कोणत्याही व्यक्तीनं जर हाजरा यांचं विधान ऐकलं तर त्याला कळेल की हाजरा कशा प्रकारची व्यक्ती आहे.”

विशेष म्हणजे वादग्रस्त विधान करणारे अनुपम हाजरा याआधी तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपात गेले. हाजरा यांची शनिवारी राहुल सिन्हा यांच्या जागी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.