भारताने आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे तीन सैनिक मारू, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे. ते शुक्रवारी पाकिस्तानी संसदेत बोलत होते. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान विरोधात युद्ध छेडल्यास भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. आगामी निवडणुकीत काश्मिरी जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भारताकडून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती चिघळविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरविण्यात भारताचा हात आहे आणि त्याचे ठोस पुरावेही आमच्याकडे असल्याचा दावा आसिफ यांनी केला. पाकमधील दहशतवादामागे असणारा भारताचा सहभाग उघड करण्यासाठी आम्ही यासंदर्भातील डोझियर कागदपत्रे आणि व्हिडिओ संयुक्त राष्ट्रसंघ आणि अन्य देशांना पाठविली आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, भारत चीन-पाकिस्तान आर्थिक पट्टा (इकोनॉमिक कॉरिडोअर) निर्मितीतही भारत अडथळे आणत असल्याचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. या आर्थिक पट्ट्यामुळे पाकिस्तानमध्ये आमुलाग्र बदल घडतील, अशी भीती भारताला वाटते. सद्यस्थितीत पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा कमकुवत असला तरी इकोनॉमिक कॉरिडोअरच्या निर्मितीनंतर पाकिस्तान भारतापेक्षा अधिक शक्तिशाली होईल, असा दावाही आसिफ यांनी केला.

गेल्या काही दिवसांत सीमारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. अखेर घाबरलेल्या पाकिस्तानने फोन करून गोळीबार थांबविण्याची आणि डीजीएमओ स्तरावर चर्चा करण्याची तयारी दाखविली. भारताने आक्रमकपणे दिलेल्या प्रत्युत्तरामुळेच गेल्या दोन दिवसांपासून सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या आहेत, असा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला होता. ते शुक्रवारी गोव्यातील सभेत बोलत होते. यावेळी पर्रिकर यांनी भारतीय सैन्याकडून सीमेवर पाकिस्तानला देण्यात येत असलेल्या चोख प्रत्युत्तराचा उल्लेख केला. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भ्याड हल्ले केले जात आहेत. मात्र, या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला आपण जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून सीमेवरील गोळीबार थांबवा, अशी विनंती करणारा दुरध्वनी आला असल्याची माहिती पर्रिकर यांनी दिली. त्यावेळी समोरून गोळीबार थांबला तर आम्हीदेखील गोळीबार थांबवायला तयार आहोत, असे भारताकडून सांगण्यात आले. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून सीमेवरील गोळीबार थांबला आहे, असे पर्रिकर यांनी म्हटले.