विज्ञान क्षेत्रातील प्रशासनातही सुधारणेचा प्रयत्न; इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही
देशात विज्ञान संशोधनास अनुकूल वातावरण तयार करतानाच विज्ञान क्षेत्रातील प्रशासनातही सुधारणा केल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. वैज्ञानिकांनी संशोधन करताना अर्थव्यवस्था, पर्यावरण, ऊर्जा, समता व समानुभूती यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र-राज्य संबंधातील प्रत्येक क्षेत्रात सहकार संघराज्यवाद महत्त्वाचे आहे असे सांगून ते म्हणाले की, केंद्र व राज्ये यांच्या वैज्ञानिक संस्थांमध्ये समन्वयाची गरज आहे. पारंपरिक ज्ञान व आधुनिक ज्ञान यांची सांगड घालून मानवी समुदायापुढील आव्हानांवर शाश्वत उत्तरे शोधली पाहिजेत. अर्थशास्त्र हे किफायतशीरतेशी, पर्यावरण हे कार्बन फुटप्रिंटशी, ऊर्जा भरभराटीशी, हरित वसुंधरेशी तर समानअनुभूती ही संस्कृतीशी तर समता ही समावेशक विकासाशी संबंधित आहे त्यामुळे ही तत्त्वे वैज्ञानिकांनी लक्षात ठेवावीत.
सुप्रशासन हे केवळ धोरण, निर्णयक्षमता, पारदर्शकता व उत्तरदायित्व याच्याशी संबंधित नाही तर विज्ञान व तंत्रज्ञानाचे धोरणात्मक पर्यायांशी एकात्मीकरण करण्याशी संबंधित आहे. विज्ञान विभाग व संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी यंत्रणा सुरू केली जाईल, विज्ञानासाठी आर्थिक साधने वाढवली जातील असे त्यांनी १०३ व्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करताना सांगितले. म्हैसुरू विद्यापीठात हे अधिवेशन सुरू झाले असून त्याचे शतक साजरे होत आहे.
भारतातील स्वदेशी विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर हा यावेळच्या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे. देशात १३०० बेटे, ७५०० कि.मीचा सागर किनारा व २४ लाख चौरस कि.मीचा विशेष आर्थिक विभाग आहे, शिवाय आपले पुढचे भवितव्य जमिनीच्या वापराबरोबरच सागराचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून आहे, त्यासाठी सागरी विज्ञानाकडे लक्ष पुरवण्याचे आवाहन त्यांनी केले.

संरक्षण सामग्रीच्या स्वयंपूर्णतेसाठी पंतप्रधान आग्रही
तुमकुरू (कर्नाटक) : भारतीय जवानांजवळील शस्त्रास्त्रे आणि उपकरणे ‘जगातील सर्वोत्तम’ असतील हे निश्चित केले जायला हवे, असे सांगून संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारताने स्वयंपूर्ण होण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. भारताला सुरक्षेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे असेल, तर आपल्याला आपली शस्त्रे स्वत:च तयार करावी लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय सैन्याचे जवान देशासाठी कुठलाही त्याग करण्यास तयार आहेत आणि ते कुणापेक्षाही कमी नाहीत. मात्र, ते बाळगत असलेली आणि वापरत असलेली शस्त्रेदेखील जगात सर्वात उत्तम असली पाहिजेत याची निश्चिती करण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ‘ग्रीनफील्ड हेलिकॉप्टर’ प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सांगितले. ५ हजार कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प तुमकुरू जिल्ह्य़ातील बिदरहल्ला कावल येथे उभारला जाणार आहे.
आमचे लष्कर सज्ज करण्यासाठी आम्ही इतर देशांकडून शस्त्रे आयात करतो. यासाठी केवळ कोटय़वधी रुपये खर्च होतात इतकेच नव्हे, तर आपल्याला तुलनेने तितकी अत्याधुनिक नसलेली आणि दुय्यम शस्त्रे मिळतात. यावर उपाय म्हणून शस्त्रास्त्रे आयातीसाठी करार करण्यापूर्वी भारत आता मागणीचा (ऑर्डर) केवळ एक भाग थेट उत्पादकाकडून खरेदी करतो आणि उर्वरित शस्त्रे भारतात तयार करण्याचा आग्रह धरतो. मागणीपैकी उर्वरित शस्त्रे भारतात तयार कराल तरच आम्ही ती घेऊ असे आता आम्ही सांगत असल्याचे मोदी म्हणाले.
भारतीय सैन्य जगातील कुठल्याही देशापेक्षा कमी असायला नको, तसेच त्यांच्याजवळील शस्त्रेही कुणापेक्षा कमी दर्जाची नकोत, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
एचएएलचा हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प हा देशाला संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने नवा प्रयत्न असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की या प्रकल्पातून पहिले संपूर्णपणे देशात बनवलेले हेलिकॉप्टर २०१८ सालापर्यंत तयार व्हावे, अशी माझी इच्छा आहे.