परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा साठवून ठेवण्याचा आरोप असलेल्या खातेधारकांपैकी काहींची नावे जाहीर करण्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱयांना सोमवारी झालेल्या ‘दिवाली मिलन’ कार्यक्रमात सांगितल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्षाची स्वबळाची समीकरणे हरयाणा व महाराष्ट्रात यशस्वीपणे अमलात आणण्याचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी मंत्र्यांना सोमवारी सायंकाळी दिवाळी फराळासाठी निमंत्रित केले होते. अत्यंत अनौपचारिक वातावरणात झालेल्या या ‘दिवाली मीलन’ कार्यक्रमात सहकाऱयांशी संवाद साधताना मोदींनी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा साठवून ठेवण्याचा आरोप असलेल्यांपैकी काहींची नावे प्रसिद्ध करूयात, अशी बातचित केल्याचे समजते.
परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात अग्रस्थानी होता. परंतु, सत्तेत आल्यानंतर काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनावर घुमजाव केल्याचे आरोप मोदी सरकारवर करण्यात येते आहेत. या आरोपांना फेटाळून लावत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काळा पैसा धारकांबद्दची माहिती दिल्यावाचून आम्ही राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच काळा पैसा परत आणण्याच्या मुद्द्यावर भारताकडून स्वतंत्रपणे चौकशी करून पुरावे देखील गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवाळीनंतर काळापैसा खातेधारकांपैकी काहींची नावे केंद्र सरकारकडून जाहिर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.