20 November 2019

News Flash

आंतरराष्ट्रीय कराराचे कोण पालन करत नाही हे आज उघड झाले: इराणचे अमेरिकेला प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यांनी इराणवर दहशतवादाला मदत केल्याचा आरोपही केला.

हसन रोहानी (संग्रहित छायाचित्र)

अणुकरारातून माघार घेणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने थेट धमकीच दिली आहे. अमेरिकेने माघार घेताच आगामी काळात इराण युरेनियमच्या साठ्यात वाढ करणार. मात्र, अणुकरार कायम राहावा यासाठी अन्य देशांशी चर्चा केली जाईल, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहांनी यांनी स्पष्ट केले. आज कोणता देश आंतरराष्ट्रीय कराराचे पालन करत नाही हे उघड झाले, असेही ते म्हणालेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यांनी इराणवर दहशतवादाला मदत केल्याचा आरोपही केला. ट्रम्प यांनी घोषणा करताच इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, हा अणुकरार कायम राहावा, यासाठी आम्ही अन्य देशांशी चर्चा करु. इराणचे परराष्ट्रमंत्री लवकरच चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि युरोपमध्ये जातील, असे त्यांनी सांगितले. अन्य राष्ट्र अमेरिकेच्या दबावाखाली न येता हा करार टिकवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

इराणने कराराचे नेहमीच पालन केले आहे. पण आज कोणता देश आंतरराष्ट्रीय कराराचे पालन करत नाही हे उघड झाले. आम्ही कोणतीही चुक केलेली नसून अमेरिकेचा हा निर्णय निंदनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.  अमेरिकेने करार मोडल्याने इराणही युरेनियमच्या साठ्यात वाढ करेल, आता साठा करण्यात कोणतीही मर्यादा नसेल. मात्र, आधी आम्ही काही काळ अन्य देशांकडून काय भूमिका घेतली जाते याची वाट बघू, असे त्यांनी सांगितले.

First Published on May 9, 2018 3:41 am

Web Title: will negotiate with world powers for nuclear deal says iran president hassan rouhani but warns us
टॅग Iran,Nuclear Deal,Us
Just Now!
X