ऑलिम्पिक चॅम्पियन आणि उत्कृष्ट हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्या म्हणून सरकारपुढे भीक मागणार नाही असे त्यांच्या मुलाने अर्थात अशोक कुमार यांनी म्हटले आहे. “भारतरत्न देण्यासाठी जी समिती असते त्यांच्यापुढे मी कोणतीही शिफारस करणार नाही किंवा हात पसरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ध्यानचंद यांना भारतरत्न दिल्या जाण्यासंदर्भातल्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. ध्यानचंद यांना भारतरत्न दिला जाईल असे कळवण्यातही आले होते. मात्र तसे काहीही घडले नाही” असेही अशोक कुमार यांनी स्पष्ट केले.

“हा निर्णय नंतर स्थगित करण्यात आला तो का ते कळू शकलेले नाही. मात्र आता पुन्हा एकदा मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्या अशी भीक मी सरकारकडे मागणार नाही असं अशोक कुमार यांनी म्हटलं आहे. पुरस्कार भीक मागून घेतले जात नाहीत ते प्रतिसाद म्हणून दिले जातात. ध्यानचंद यांचा सन्मान भारतरत्न पुरस्काराने करायचा की नाही हे ठरवण्याचा निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे. ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावं असं सरकारला वाटत असेल तर ते देतील”, असंही अशोक कुमार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.