मध्य प्रदेश आणि छत्तीसगडध्ये सत्ता मिळताच आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. कर्जमाफीसाठी आम्ही मोदी सरकारला भाग पाडू असं सांगताना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मोदी सरकारला झोपू देणार नाही असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.

नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलेलं नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन कर्जमाफीची मागणी करु. कर्जमाफीसाठी आम्ही मोदी सरकारला भाग पाडू. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मोदी सरकारला झोपू देणार नाही असं राहुल गांधी बोलले आहेत. शेतकऱ्यांना हा देश तुमचा आहे कोणा करोडपतींचा नाही. तुमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम करत आहोत असंही राहुल गांधी बोलले आहेत.

नोटाबंदी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. देशातील शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना लुटण्यात आलं असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी कर्जमाफी शक्य आहे. आम्ही फक्त सहा तासांत दोन राज्यात केली असून तिसऱ्या राज्यात लवकरच करणार आहोत अशी माहिती दिली. राहुल गांधींना यावेळी सज्जन कुमार याबद्दल विचारलं असता मी आधीच माझं म्हणणं स्पष्टपणे मांडलं असून याआधीही अनेकदा सांगितलं आहे. ही पत्रकार परिषद कर्जमाफीवर आहे असं त्यांनी सांगितलं.