पाकिस्तानात उद्भवलेल्या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानातील नवनिर्वाचित आणि लवकरच स्थापन होणारे पीएमएल (एन) सरकार भारताकडून वीज आयात करण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करीत आहे. येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताकडून सुमारे १ हजार मेगाव्ॉट वीज खरेदी करण्याचा पाकिस्तान सरकारचा मानस आहे.
पाकिस्तानात सध्या विजेचा तुटवडा आहे. या समस्येवर मात करण्यासाठी इराण, मध्य आशियातील राष्ट्रे आणि भारत असे पर्याय पाकिस्तानसमोर आहेत. विकासासाठी तसेच सार्वजनिक हितार्थ ही आयात करणे पाकिस्तानसाठी अनिवार्य आहे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
पाकिस्तानातील नवनिर्वाचित सरकार स्थापनेसाठी सज्ज असलेले नवाझ शरीफ या ऊर्जा समस्येवर कसा तोडगा काढता येईल याचा विचार करीत आहेत. मात्र उपरोक्त पर्यायांपैकी भारतातून वीज खरेदी करण्याचा पर्याय सर्वात स्वस्त आणि सुलभ असल्याने याच पर्यायाचा वापर पाकिस्तानकडून  केला जाईल, असे जागतिक बँकेच्या इस्लामाबाद येथील एका अधिकाऱ्याने सांगितले. येत्या एक-दोन वर्षांत भारताकडून १ हजार मेगाव्ॉटची खरेदी पाकिस्तान सरकार करेल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. त्यासाठी वहनक्षमता, आर्थिक निकष आणि विद्युत वहन यंत्रणा आदी बाबींचा विचार सुरू असल्याचेही स्पष्ट केले.