हैदराबादमधील स्फोटानंतर काँग्रेसने हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केला होता. काही मतांसाठी काँग्रेसने हिंदू धर्माची बदनामी केली. पण आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. आता आज रात्री १२ च्या ठोक्याला राहुल गांधी हिंदूंची माफी मागण्यासाठी मेणबत्ती घेऊन इंडिया गेट येथे येणार का, असा सवाल भाजपाने विचारला आहे. टू जी प्रकरणात न्यायालयाच्या निकालाचे समर्थन करणारी काँग्रेस आज बॉम्बस्फोटांप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे, असेही भाजपाने म्हटले आहे.

हैदराबादमधील मक्का मशिदीबाहेर मे २००७ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची आज निर्दोष सुटका केली. या निकालानंतर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. ‘हैदराबादमध्ये स्फोट झाला त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. २००७ ते २०१४ काँग्रेस सत्तेवर होती आणि त्यानंतर भाजपाची सत्ता आली. जर बॉम्बस्फोटाप्रकरणी काँग्रेसकडे पुरावे होते तर त्यांनी त्यांच्या काळात ते पुरावे न्यायालयात का सादर केले नाही, असा सवाल त्यांनी विचारला. सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केला. काही मतांसाठी त्यांनी हिंदू धर्माची बदनामी केली. हे सगळं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरुनच झाले होते, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने टू जी प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाचे समर्थन केले होते. न्यायालयाने योग्य निर्णय दिला, असे काँग्रेसने म्हटले होते. आज न्यायालयाने हैदराबादमधील खटल्याप्रकरणी निकाल दिला तर काँग्रेसने तपासावर प्रश्न उपस्थित केले, एनआयएने योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही, असा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. ही दुटप्पी भूमिका का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या चेहऱ्यावरील मुखवटा आज दूर झाला आहे. हिंदू दहशतवादाच्या नावाखाली हिंदू धर्माची बदनामी करण्याचे जे प्रयत्न सुरु होते, त्याचा आज पर्दाफाश झाला, असे त्यांनी सांगितले. बाटला हाऊस चकमकीनंतरही काँग्रेसने शहीद पोलिसांकडे दुर्लक्ष केले. पण त्यांना दहशतवाद्यांची चिंता जास्त होती, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने ओसामा बिन लादेन यांच्यासोबत चांगले केले नाही, असे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते. एका समाजासाठी तुम्ही ही भूमिका घेता व हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग करता. आता काँग्रेसने देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.